गो-मय गणेशमूर्ती आणि रक्षाबंधनासाठी वैदिक राख्यांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:11+5:302021-08-21T04:38:11+5:30
वरवटी येथील गो-शाळेचा अभिनव उपक्रम अंबाजोगाई : तालुक्यातील वरवटी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे गोरक्षण शाळेने गतवर्षीपासून पर्यावरणपूरक अशा गोमय ...
वरवटी येथील गो-शाळेचा अभिनव उपक्रम
अंबाजोगाई : तालुक्यातील वरवटी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे गोरक्षण शाळेने गतवर्षीपासून पर्यावरणपूरक अशा गोमय गणेशमूर्ती आणि यावर्षी प्रथमच रक्षाबंधनासाठी आकर्षक अशा वैदिक राख्या तयार केल्या आहेत. यातून पर्यावरण संवर्धन करण्याचा मौलिक संदेश देण्यात आला आहे, अशी माहिती लोकनेते गोपीनाथ मुंडे गोरक्षण शाळेचे प्रमुख ॲड. अशोक मुंडे यांनी दिली आहे.
मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगासमोर कोरोना या संसर्गजन्य रोगराईचे मोठे संकट उभे टाकले आहे. अशा परिस्थितीत आपण अतिशय साध्या पद्धतीने आपले प्रत्येक सण साजरे करीत आहोत. त्याचप्रमाणे यावर्षी आपण सर्वजण गणेशोत्सव ही अतिशय साधेपणाने आणि शासनाने कोविड पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे पालन करीत साजरा करूया. घरच्या घरी कुंडीमध्ये श्रींचे विसर्जन करून पर्यावरण संवर्धन करूया. कारण, मानवी जीवनात आपण नकळत किंवा अजाणतेपणामुळे निसर्गाचा समतोल बिघडविण्याचे काम करीत आहोत.
या बाबींचा विचार करून राष्ट्रीय कामधेनू आयोग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार काही गोष्टी व गो-सेवा गतीविधी, देवगिरी प्रांत यांच्या विधायक सूचनांप्रमाणे तसेच गो-शाळेतील गायींचे संगोपनासाठी गो-शाळा स्वावलंबी बनणे गरजेचे आहे. देश-देव अन् धर्मासाठी गो-आधारित विविध जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करून गो-शाळा स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच विचाराला बळ देण्यासाठी गतवर्षीपासून पर्यावरणपूरक आणि आकर्षक अशा गो-मय गणेशमूर्ती तयार केल्या. पर्यावरणाची हानी तसेच जलप्रदूषणही होणार नाही. तसेच जीव दया ही होईल. या विधायक उद्देशाने आम्ही गो-मय गणेशमूर्ती सोबत एक कुंडी व वनौषधींचे-बी आणि भाजीपाल्याचे-बी देण्यात आले. या गो-मय गणेशमूर्तींना गणेश भक्तांकडून गतवर्षी भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांकडून रक्षाबंधनासाठी गोमय ''वैदिक राखी'' मिळेल का अशी विचारणा ही करण्यात आली होती. त्यानुसार यावर्षी प्रथमच गोमय वैदिक राखी तयार केली आहे, असे ॲड. अशोक मुंडे यांनी सांगितले.
200821\img-20210819-wa0050.jpg
गो शाळेत तयार करण्यात आलेले पर्यावरणपुरक गणेशमूर्ती व राखी