अंबाजोगाईत ‘मांजरा’च्या कार्यालय स्थलांतरास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:29 PM2018-01-13T23:29:24+5:302018-01-13T23:31:10+5:30
दोन मंत्र्यातील वादात अधिका-यांनी कारस्थान करून नाहक प्रतिष्ठेच्या करून ठेवलेल्या मांजरा धरणाच्या उपविभागीय कार्यालयाच्या स्थलांतरास अखेर शासनाने स्थगिती दिली. येत्या १५ जानेवारी रोजी सदर कार्यालयाचे अंबाजोगाईत होणारे स्थलांतर रोखण्यास लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील यांना यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : दोन मंत्र्यातील वादात अधिका-यांनी कारस्थान करून नाहक प्रतिष्ठेच्या करून ठेवलेल्या मांजरा धरणाच्या उपविभागीय कार्यालयाच्या स्थलांतरास अखेर शासनाने स्थगिती दिली. येत्या १५ जानेवारी रोजी सदर कार्यालयाचे अंबाजोगाईत होणारे स्थलांतर रोखण्यास लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील यांना यश आले आहे.
डाव्या कालव्यावरील केज आणि रेणापूर या दोन तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण अंबाजोगाई येत असल्याचे लक्षात घेता तसेच मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय जिल्हा मुख्यालयाऐवजी क्षेत्रीय स्तरावर असणे प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे आहे.
त्यामुळे मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय लातूर येथून अंबाजोगाई येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याचे शासनाने दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. तसेच हे कार्यालय तातडीने म्हणजेच येत्या १५ जानेवारीला कार्यान्वित करण्याचे आदेशही शासनाने दिले होते.
परंतु, या कार्यालयाचे स्थलांतर होऊ नये, यासाठी अधिकाºयांची लॉबी प्रयत्नशील झाली होती. आरामात लातुरात राहायची सवय लागलेल्या अधिका-यांना अंबाजोगाईस होणा-या संभाव्य येरझा-या नको वाटत होत्या. त्यासाठी त्यांनी राजकीय पुढा-यांना चुकीची फिल्डींग करत हे स्थलांतर नको तेवढे प्रतिष्ठेचे करून ठेवले आणि याला पंकजा मुंडे आणि संभाजी पाटील निलंगेकर या दोन मंत्र्यातील वादाचा प्रश्न केला.
अमित देशमुख यांनीही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. संभाजी पाटील यांनीही अंतर्गत राजकीय वजन वापरत गिरीश महाजन यांना स्थलांतराच्या आदेशास स्थगिती देण्यास भाग पाडले. जलसंपदा विभागाने प्र.क्र. ७४/ २०१८/दि. ११/१/२०१८ या आदेशाने स्थलांतरीत होणा-या कार्यालयास स्थगिती दिली आहे.
महाराष्ट्राचे अवर सचिव सु. ग. गांगरकर यांनी हा आदेश काढला आहे. कार्यालयाच्या स्थलांतराचे श्रेय घेण्यासाठी धडपडणारे केज मतदार संघातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आता स्थलांतरास दिलेल्या स्थगितीबाबत काय भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कार्यालयासाठी अंबाजोगाईच योग्य
सर्वांच्या सोयीसाठी हे कार्यालय पूर्वी अंबाजोगाईतच होते. भौगोलिक दृष्ट्या अंबाजोगाई धरणक्षेत्राच्या मध्यभागी येत असल्याने कार्यालयासाठी योग्य ठिकाण आहे. लातूरच्या सिंचनक्षेत्रात बाय्रेजेसचे क्षेत्र दाखवून लातूरचे क्षेत्र अधिक असल्याची दिशाभूल करणारी आकडेवारी दाखविली जात आहे. याचा फटका बीड जिल्ह्यातील शेतक-यांना बसणार असून लहान-सहान अडचणींसाठी त्यांना ८०-९० किमी अंतर ओलांडून जावे लागणार आहे. हे कार्यालय अंबाजोगाईतच असले पाहिजे असे मत मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी व्यक्त केले.
स्थगिती आदेश रद्दसाठी प्रयत्न करणार
हे कार्यालय सर्वांच्या सोयीचे असल्याने मोठे प्रयत्न करून आपण हे कार्यालय अंबाजोगाईला स्थलांतरीत केले होते.
रद्द करण्यात आलेल्या हा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करू असे
आ. संगीता ठोंबरे म्हणाल्या.