स्थलांतराने रोहयोची कामे घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:30 AM2021-01-21T04:30:37+5:302021-01-21T04:30:37+5:30
अंबाजोगाई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या कामांना मागणी घटल्याचे चित्र आहे. सध्या शेतात मोठ्या ...
अंबाजोगाई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या कामांना मागणी घटल्याचे चित्र आहे. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात मशागतीची कामे, काढणी, मोडणी, ऊसलागवड सुरू असल्याने शेतमजुरांना शेतावरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. तर ग्रामीण भागातील बहुतांश मजुरांनी ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे स्थलांतर केले आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरामुळे हे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती
अंबाजोगाई : इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा अंबाजोगाई तालुक्यात सुरू आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होत असले तरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्यास अजूनही धजावत नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत साशंक आहेत. शाळेत शिक्षक आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची अत्यल्प संख्या आहे.
अवैध वाळू उपशावर नियंत्रण दिसेना
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदीपात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी होत आहे.
भाजीमंडईतील कोंडी कायम
बीड : शहरातील भाजीमंडईत प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
स्थानकात अस्वच्छता ; आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बसस्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
कित्येक महिन्यांपासून घरकुलाचे हप्ते थकले
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगर परिषदेकडून लाभार्थिंच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनदेखील आश्वासनाशिवाय लाभार्थिंना दुसरे काहीही मिळत नाही. तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.