कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:01+5:302021-06-19T04:23:01+5:30
बैठक आटोपून जात असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या छायाचित्रात जमाव दिसत आहे. ...
बैठक आटोपून जात असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या छायाचित्रात जमाव दिसत आहे.
छाया : संतोष राजपूत
बीड : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडल्याने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सेवेत कायम करून घ्यावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अडविला. अचानक गर्दी जमल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करीत जमाव पांगविला. यामुळे काही वेळ गोंधळ उडाला, पळापळ झाली.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत होती. आरोग्य यंत्रणेचे मनुष्यबळ अपुरे पडत होते. यामुळे तीन महिन्यांच्या कंत्राटावर वॉर्डबॉय, परिचारिका, डाटा एंट्री ऑपरेटर, हॉस्पिटल मॅनेजर, डॉक्टर, औषधनिर्माण अधिकारी, आदी पदे भरण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले; परंतु, आता रुग्णसंख्या कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत आहे. कामावरून काढू नये, तसेच आरोग्य सेवेत कायम करून घ्यावे, यासाठी आरेाग्य कर्मचारी आक्रमक झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा उस्मानाबादकडे रवाना झाला. याच दरम्यान शासकीय विश्रामगृहासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी गाड्यांचा ताफा अडविला. यावेळी तणाव निर्माण झाला होता. हा तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. काही कर्मचारी दुभाजकावरून पडल्याने जखमीही झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची मागणी केली. बैठक सुरू असल्याने त्यास जाऊ दिले नाही; तेव्हा या कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
लाठीचार्जची चौकशी करा - सुरेश धस
कोरोना महामारीत नातेवाईक जवळ येत नव्हते, अशा वेळी या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले. हे लोक आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, ही बाब निषेधार्ह आहे. कोणाच्या सांगण्यावरून हा लाठीचार्ज केला, याला कोण जबाबदार याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली.
निवेदन न घेताच ताफा सुसाट
कर्मचारी निवेदन देण्यासाठी गाड्यांकडे धावले; परंतु, एकाही मंत्र्याने अथवा अधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन घेतले नाही. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले होते. ताफा पुढे गेल्यावर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु, तरीही कर्मचारी आक्रमक होते. सरकारविरोधात घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
===Photopath===
180621\18_2_bed_4_18062021_14.jpg
===Caption===
उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा अडविताना कंत्राटी आरोग्य कर्मचारी दिसत आहेत.