बाजरी पाण्यात पोहतेय, उडीद वायाला गेला, लय वाटोळं झालं साहेब...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:19+5:302021-09-03T04:35:19+5:30
कडा : आधी पाऊस नव्हता म्हणून पिकं वायाला गेली. राहिलीसाहिली पाण्यावर केलेली पिके काही कळायच्या आत पावसाने हिरावली. साहेब, ...
कडा : आधी पाऊस नव्हता म्हणून पिकं वायाला गेली. राहिलीसाहिली पाण्यावर केलेली पिके काही कळायच्या आत पावसाने हिरावली. साहेब, आमच्या शेतीचं लय वाटोळं झालं. कांदे वाहून गेले, बाजरी पाण्यात पव्हती, उडीद वायाला गेलाय, आता आगीतून निघून फुपाट्यात पडल्यासारखं झालंय. आम्हाला मदत करा, अशी व्यथा शेडाळा येथील वयोवृद्ध शेतकरी रामभाऊ गोविंद सरतपे यांनी पालकमंत्र्यांसमोर पोटतिडकीने मांडली. आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे गुरूवारी दौरा केला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.
आष्टी तालुक्यात खरिपाच्या पेरण्या झाल्यानंतर पावसाने अखडते घेतल्याने पाण्याअभावी पिके जळून वाया गेली. काही पिके विहीर, बोअरच्या पाण्यावर जगवली. जेव्हा गरज होती तेव्हा आला नाही आणि आता हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. अख्खे पीक पाण्यात पव्हतेत, शेतात जाता येईना, रानं उपळली, लावलेले कांदे वाहून गेले, उडदाचे लय नुकसान झालंय. शेतीने थोडी जरी साथ दिली तरी संकट आमच्या मानगुटीवर बसतंय या पावसाने सारं हिरावलंय आता आम्हाला या संकटातून सावरा, अशी विनवणी रामभाऊ गोविंद सरतपे यांनी यावेळी केली.
नुकसान भरपाई मिळवून देतो बाबा काळजी करू नका
वयोवृद्ध आजोबांनी आपल्या शेतीच्या नुकसानीची व्यथा पोटतिडकीने मांडताच पालकमंत्र्यांनी ‘बाबा तुम्ही काळजी करू नका, मी नुकसानीची पाहणी करायला आलोय, तुम्हाला भरपाई मिळवूनच देणार’, या शब्दात खचलेल्या हताश झालेल्या शेतकऱ्याला धीर देत त्याचे मनोबल वाढवल्याचे दिसून आले.
020921\nitin kmble_img-20210902-wa0027_14.jpg