बीडमध्ये कोट्यवधींचा निधी ‘चिखलात’; रिमझिम पावसाने मैदान खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:35 PM2017-12-07T23:35:33+5:302017-12-07T23:36:59+5:30
क्रीडांगण विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मैदानाची बकाल अवस्था झाली. एवढेच नव्हे तर रिमझिम पावसानेच मैदानात सर्वत्र चिखल झाल्याचे बुधवारी दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : क्रीडांगण विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मैदानाची बकाल अवस्था झाली. एवढेच नव्हे तर रिमझिम पावसानेच मैदानात सर्वत्र चिखल झाल्याचे बुधवारी दिसले.
त्यामुळे क्रीडांगण विकासासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी ‘चिखलात’ गेल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने क्रीडा कार्यालयाचा गलथान ‘खेळ’ चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या चिखलामुळेच प्रतिष्ठेच्या मानली जाणा-या ‘बीपीएल’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनही रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली.
मागील काही महिन्यांपासून जिल्हा क्रीडा कार्यालयातील कार्यालयीन कामकाज ढेपाळण्याबरोबरच मैदानाचीही पूर्णत: वाट लागली आहे. क्रीडांगण विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासन व वेगवेगळ्या योजना, संकुल समितीतून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु येथील जिल्हा क्रीडा अधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांनी गुत्तेदारांशी संगनमत करुन कामे निकृष्ट केली. याचा परिणाम अवघ्या काही महिन्यांतच दिसून आला.
ज्या कामांसाठी कोट्यवधी खर्च केले ते अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच खराब झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर या संबंधित गुत्तेदारांवर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाºयांनाच गुत्तेदारांनी खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आम्ही तुमचे काम ‘उत्कृष्ट’ केले, असे सांगून अधिकाºयांनाच ‘चालते व्हा’ असे बोल सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे कार्यालयातील कामे करण्यासाठी येथील अधिकारी हे ‘टक्केवारी’ने पैसे वसूल करीत असल्याचेही नानकसिंग बस्सी यांच्यावरील कारवाईवरुन स्पष्ट झाले होते. बस्सी सारख्या अधिका-यांची पाठराखणही जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केली होती. त्यामुळे या ‘टक्केवारी’त त्यांचाही ‘वाटा’ असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे.
खुरपुडेंकडून दिशाभूल
क्रीडा संकुल दर्जेदार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना प्रत्येक बैठकीत सांगतात. कागदोपत्री कामकाज दाखवून जिल्हाधिकाºयांची दिशाभूल खुरपुडे करीत आहेत. महसूल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने खुद्द जिल्हाधिकाºयांनीच संकुलाची बकाल अवस्था काही दिवसांपूर्वीच पाहिली आहे.
या कार्यक्रमासाठी मैदान समितीत असतानाही नंदा खुरपुडेंनी कारण सांगून दांडी मारली. आपला गलथान कारभार चव्हाट्यावर येईल, या भीतीनेच त्यांनी असे कृत्य केल्याची चर्चा होती.
खुरपुडे या वारंवार या ना त्या कारणावरून जिल्हाधिकाºयांची दिशाभूल करीत असल्याचे आरोप क्रीडाप्रेमींमधून होत आहेत.
क्रीडा कार्यालयात अंतर्गत राजकारण; डीएसओंची मनमानी
क्रीडा कार्यालयात अंतर्गत राजकारणही जोरात सुरू आहे. क्रीडा अधिकारी व इतर कर्मचारी, मार्गदर्शकांना खुरपुडेंकडून उद्धट वागणूक दिली जात आहे. तसेच कारवाइची धमकी देऊन दबाव आणला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी खुरपुडे यांची व कार्यालयातीलच एका अधिकाºयासोबत ‘तूतू-मैंमै’ झाली होती. हा वाद उपसंचालकांपर्यंत गेल्याचेही सूत्रांनी सांगितले. दिवसेंदिवस खुरपुडे यांची मनमानी वाढत असून त्यांची कारकीर्दही वादग्रस्त असल्याचे समोर येत आहे.
लाखांचे भाडे हजारांवर
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मैदानाचे भाडे व इतर प्रोसेस पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या स्पर्धा व्यावसायिक असल्याचे कारण पुढे करून नंदा खुरपुडे यांनी यासाठी लाख रूपयांचे भाडे आकारले. त्यानंतर असोसिएशनने आवाज उठविला. आपली तक्रार वरिष्ठांकडे होईल, या भीतीने त्यांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्यादिवशी जिल्हाधिकारी यांना टिप्पणी टाकून हजार रूपये भाडे आकारण्याचे सुचविले. रात्री उशिरापर्यंत त्याला मंजुरी मिळाली की नाही, याचीही कल्पना त्यांना नव्हती. यावरून त्यांचा कारभार कशाप्रकारे चालतो, हे स्पष्ट होते. लाख रूपयांचे भाडे आकारून नेमके काय करायचे होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.