सॉफ्टवेअर मोफत असताना लाखो रुपये केले खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:33 AM2021-01-25T04:33:47+5:302021-01-25T04:33:47+5:30

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या राहुल रेखावार यांची तीन दिवसापूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या काळातील अनेक नियमाला बगल देत केलेल्या गोष्टी ...

Millions of dollars spent while the software is free | सॉफ्टवेअर मोफत असताना लाखो रुपये केले खर्च

सॉफ्टवेअर मोफत असताना लाखो रुपये केले खर्च

Next

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या राहुल रेखावार यांची तीन दिवसापूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या काळातील अनेक नियमाला बगल देत केलेल्या गोष्टी समोर येत आहेत. जिल्हाधिकारी हे सेतू समितीचे अध्यक्ष असतात. सेतू समितीकडे स्वतःचा असा निधी असतो. मात्र बीड जिल्ह्यातील सेतूच्या निधीचे मागच्या अनेक वर्षांपासून लेखा परीक्षण झालेले नाही. त्यामुळे या निधीतून खर्च केला जाऊ नये, असे मत कनिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदविले होते. मात्र, असे असताना ई-पीक पाहणी कार्यक्रमाच्या प्रसार प्रसिद्धीसाठी या निधीतून लाखो रुपये दिले आहेत. त्यासोबतच रेखावार यांनी सुरू केलेल्या ई-टपाल या कार्यक्रमावरदेखील तब्बल १२ लाखाहून अधिकची देयके याच निधीतून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ‘एनआयसी’चे ई-ऑफिस हे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध असताना ‘ई-टपाल’वर ही उधळपट्टी केली आहे.

ई-टपाल होणार बंद?

तत्कालीन जिल्हाधिकारी राहुुल रेखावार हे धुळे येथे कार्यरत असताना ई-टपाल हा कार्यक्रम त्याठिकाणी राबविला होता. दरम्यान, काही महिन्यातच त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा हा कार्यक्रम बासनात गुंडाळण्यात आला होता. दरम्यान, त्याठिकाणी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर बीड येथेदेखील राबविण्यात आले होते. यामुळे कामकाज सुरळीत होण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणा सुसज्ज नसल्यामुळे किचकट व कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे मत खासगीत बोलताना अनेकांनी व्यक्त केले होते. त्यामुळे ई-टपाल बंद होण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे.

यासंदर्भात प्रशासनाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांच्या आदेशानुसार या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली.

Web Title: Millions of dollars spent while the software is free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.