नोकरी सोडून दिलेल्या लष्करी जवानाचा किरकोळ वादातून तरुणांवर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:06 AM2019-08-20T00:06:31+5:302019-08-20T00:08:07+5:30
तालुक्यातील करंजवन या गावात किरकोळ वादातून नोकरी सोडून दिलेल्या लष्करी जवानाने गोळीबार केला.
पाटोदा : तालुक्यातील करंजवन या गावात किरकोळ वादातून नोकरी सोडून दिलेल्या लष्करी जवानाने गोळीबार केला. गोळीबार करण्यापूर्वी या जवानाने ज्याच्यावर गोळी चालवली त्याच्यासह दुसऱ्या तरुणाच्या अंगावर गाडी घातली होती. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हे थरार नाट्य घडले.
दरम्यान पोलीस अधीक्षकांनी ठाणे प्रभारींना माध्यमांना परस्पर माहिती न देण्यासंदर्भातील आदेशाचे पत्र दाखवून स्थानिक पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. तर गोळीबाराची अफवा असल्याचेदेखील पोलिसांकडून सांगण्यात येत होते.
समजलेलेल्या माहितीनूसार करंजवन येथील लष्कारातील नोकरी सोडून आलेल्या खाडे नामक जवानाने गावाजवळच्या देवदरा मंदिर परिसरात गावातीलच गर्जे आणि खाडे नामक तरुणांशी केळीच्या कारणावरुन वाद घातला होता. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खाडे याने गावात या तरुणाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. त्यानंतर खाडे याने त्याच्याजवळील पिस्तूलामधून गर्जे यांच्या दिशेने गोळी झाडली. दोन्ही प्रकारातून बचावल्यानंतर तरुणांनी पाटोदा पोलीस ठाणे गाठले. मात्र, त्यांच्या पाठीमागे हा जवानही ठाण्यात आला. या सर्वांना पोलिसांनी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवले होते. वरिष्ठअधिकारी यात्रा बंदोबस्तासाठी बाहेरगावी असल्याने गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केलेली नव्हती.