लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन युवतीस पेटविले; बीड जिल्ह्यात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:16 AM2017-12-30T00:16:21+5:302017-12-30T00:17:54+5:30
लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने इतर तिघांच्या मदतीने अल्पवयीन युवतीच्या घरात घुसून तिला पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे २६ डिसेंबर रोजी घडली. या युवतीवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २८ रोजी तिचा जवाब घेऊन गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींना शुक्रवारी रात्री आठ वाजता अटक करण्यात आली आहे.
अंबाजोगाई : लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने इतर तिघांच्या मदतीने अल्पवयीन युवतीच्या घरात घुसून तिला पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे २६ डिसेंबर रोजी घडली. या युवतीवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २८ रोजी तिचा जवाब घेऊन गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींना शुक्रवारी रात्री आठ वाजता अटक करण्यात आली आहे.
सुनिता (नाव बदलले) असे या पीडित युवतीचे नाव आहे. ती सध्या महाविद्यालयात शिकत आहे. तिने जवाबात सांगितल्यानुसार आई-वडील सध्या साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी गेले आहेत. त्यामुळे ती आजी आणि दोन भावांसह सोनवळा येथेच स्वत:च्या घरी राहते. मागील आठवड्यात गावातीलच महादेव जालिंदर घाडगे या तरुणाने सुनिताला लग्नासाठी मागणी घातली होती, परंतु तिने नकार दिला होता. २६ डिसेंबर रोजी आजी वीज बिल भरण्यासाठी अंबाजोगाईला आली होती, तर एक भाऊ शाळेत आणि एक भाऊ चुलत्याकडे गेलेला असल्याने ती घरी एकटीच होती.
दुपारी चारच्या सुमारास आरोपी महादेव, त्याचा मामा बबन नरहरी मस्के, आई कविता जालिंदर घाडगे आणि मामी सुवर्णा बबन मस्के हे चौघेजण तिच्या घरी आले. यावेळी महादेवने सुनितास माझ्याशी लग्न करणार आहेस का? असे विचारले. यावर सुनिताने माझे वडील आणि चुलते यासाठी नाहीच म्हणणार आहेत आणि मी देखील तुझ्यासोबत लग्न करणार नाही असे सांगितले. त्यानंतर बबन व कविता यांनी सुनिताचे दोन्ही हात धरले व महादेवने जवळच ठेवलेला डब्ब्यातून तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि सुवर्णा हिने काडी ओढून सुनिताला पेटवून दिले.
यानंतर चौघेही आरोपी पसार झाले. जीवाच्या आकांताने मी आरडाओरडा केली. माझा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्यांनी मला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले, असे सुनिताने जवाबात सांगितले आहे.
प्रकृती गंभीर
या घटनेत सुनिता ६१ टक्के भाजली असून, तिची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी तिचा पोलीस उपअधीक्षक यांच्यासमोर फौजदार देवकन्या मैंदाड यांनी इन कॅमेरा जबाब नोंदविला. याप्रकरणी सुनिताच्या जवाबावरून आरोपी महादेव जालिंदर घाडगे, बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे आणि सुवर्णा बबन मस्के या चौघांवर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, चौघांनाही हटक करण्यात आली आहे.