अंबाजोगाईत आत्महत्येची धमकी देत तरुणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:31 PM2018-01-08T18:31:11+5:302018-01-08T18:31:48+5:30
महाविद्यालयीन तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस सतत आत्महत्येच्या धमक्या देत जबरदस्तीने मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला भेटीच्या बहाण्याने बोलवून अत्याचार केल्या प्रकरणी तरुणावर शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.
अंबाजोगाई (बीड ) : महाविद्यालयीन तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस सतत आत्महत्येच्या धमक्या देत जबरदस्तीने मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला भेटीच्या बहाण्याने बोलावून अत्याचार केल्या प्रकरणी तरुणावर शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.
याप्रकरणी परळी येथील अल्पवयीन पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पिडीता शहरातील एका तंत्रविद्यानिकेतन (पाॅलिटेक्निक) महाविद्यालयात शिक्षण घेते व अन्य तीन मैत्रिणींसोबत महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कॉलेजच्या कँटीनमध्ये एका मैत्रिणीने तिची प्रेमजीत सज्जन माने (रा. चाडगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) याच्यासोबत ओळख करून दिली. प्रेमजीत हा सध्या शिक्षणासाठी म्हणून शहरातच भाड्याची खोली करून राहतो.
पिडीतेशी ओळख झाल्यानंतर त्याने तिच्या मैत्रिणी कडून तिचा मोबाईल नंबर मिळविला. त्यांनतर प्रेमजीतने तिला सतत फोन करून मैत्री करण्यासाठी आत्महत्येची धमकी दिली. यामुळे भीतीपोटी पिडीतेने त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर प्रेमजीत पुन्हा तिला त्याच्या खोलीवर येण्यासाठी आत्महत्येची धमकी देऊ लागला. नाईलाजाने पीडिता एका मैत्रिणीसोबत त्याच्या खोलीवर गेली. यावेळी तिची मैत्रीण तेथून निघून गेल्याने ती एकटीच असल्याची संधी साधत प्रेमजीतने तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेची कुठे वाच्यता केली तर तुझे तरी किंवा स्वतःचे तरी बरेवाईट करीन अशी धमकी त्याने दिल्याने पिडीतेने याबद्दल कोणालाही काही सांगितले. नाही. यानंतर दिवाळीच्या सुटीत पिडीता गावाकडे गेली असतानाही त्याने सतत तिला फोन केले. डिसेंबर महिन्यात कॉलेज सुरु झाल्याने ती शहरात परत आली. दि. २ जानेवारी रोजी प्रेमजीत पिडीतेकडे गेला आणि माझ्यासोबत आली नाहीस तर आत्महत्या करतो अशी पुन्हा धमकी दिली व तिला रिक्षात बसवून बस स्थानकावर आणले. बसमधून त्याने तिला लातूर रेल्वे स्थानकावर नेले आणि आपल्याला पुण्याला जायचे आहे असे सांगितले. परंतु, लातूर रेल्वे स्थानकावरील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दोघांना हटकले आणि पिडीतेकडून तिच्या वडिलांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना सर्व माहिती कळविली.
पिडीतेच्या वडिलांनी तातडीने धाव घेत रेल्वे स्थानकावरून तिला माघारी आणले. घरी आल्यानंतर तिने आरोपी प्रेमजीत याने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले असा घटनाक्रम पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून आरोपी प्रेमजीत सज्जन माने याच्यावर कलम ३७६, ३६६-अ, ३६३, ५०६ आणि पोक्सो कायद्यान्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत.