कौटुंबिक वादातून मंत्रालयीन कर्मचाऱ्याचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:59 PM2018-12-26T23:59:04+5:302018-12-27T00:00:14+5:30
मुंबई येथे मंत्रालयातील कर्मचारी सुटीसाठी गावाकडे आला असता कौटुंबिक वादातून मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मुंबई येथे मंत्रालयातील कर्मचारी सुटीसाठी गावाकडे आला असता कौटुंबिक वादातून मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.
संतोष भगवान थोरे असे त्या अपहृत कर्मचाºयांचे नाव आहे. संतोष थोरे यांची सासरवाडी गावातीलच आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता संतोष, आई आणि वडिलांचे संतोषची पत्नी आणि तिचे वडील रामदास गर्जे यांच्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता संतोष आई, वडिलांसह घरी थांबलेले असताना संदीप जायभाये (रा. तेलंगशी, ता. जामखेड) आणि इतर काही व्यक्ती तिथे आले. संतोष यांना घराबाहेर बोलावून घेत त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. संतोषच्या आईवडिलांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी संतोषला एक गाडीत टाकून पळवून नेले अशी तक्रार त्यांची आई सुशीला थोरे यांनी पाटोदा पोलिसात दिली. याप्रकरणी संदीप जायभाये आणि अन्य व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.