दिशाभूल करून कार्यालयातील शिक्के कागदपत्रांवर मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:21+5:302021-08-15T04:34:21+5:30
अंबेजोगाई : येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून कागदपत्रांवर शिक्के मारून दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात ...
अंबेजोगाई : येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून कागदपत्रांवर शिक्के मारून दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. अंबेजोगाई येथील सहायक उपअधीक्षक भूमिलेख मुबारक शेख यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, बद्रीनारायण पिता पापालाल जाजू, सुभाष पापालाल जाजू, विष्णुदास पापालाल जाजू, सर्व रा.मंगळवार पेठ, अंबेजोगाई यांनी संगनमत करून गट नंबर ४१ मधील मोजणी रजि. क्र. ६८७/१० अन्वये भानुदास चव्हाण व रवींद्र परदेशी यांच्या क्षेत्रातील १ हेक्टर ९ आर. जमीन दाखवून, त्या जागेसंबंधी मोजणी अर्ज करून, भूमिअभिलेख कार्यालयामार्फत त्या जागेची मोजणी झालेली असताना, नकाशाची अ-शीटची झेरॉक्स काढताना ब, क शीट बनविण्याकामी दिले असता, लोकांनी भूमापकासोबत जाऊन त्या मोजणी नकाशाच्या जादा प्रती काढून घेतल्या. त्यानंतर, ३० जुलै रोजी वरील सर्व जण व शेख बाबन महमद (रा.अंबेजोगाई) हे कार्यालयात आले व त्यांनी कर्मचारी लंच टाइममध्ये कर्मचारी जेवण करीत असताना, कार्यालयातील लोकांची नजर चुकवून काढून घेतलेल्या, फायनल न झालेल्या मोजणी नकाशाच्या जादा प्रतींवर कार्यालयाचे शिके मारून घेतले. जी जमीन त्यांची नाही, हे माहीत असतानाही त्यांचे खोटे कब्जात असल्याचे भासवून भूमिअभिलेख कार्यालयाची फसवणूक केली. म्हणून चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किसन घोळवे करीत आहेत. वडिलोपार्जित मिळकतीमधून बेदखल करण्याचा प्रयत्न अंबेजोगाई शहरातील सुभाषचंद्र पिता पापालाल उर्फ रामवल्लभ जाजू (वय ७२ वर्षे), रा.मंगळवार पेठ, अंबेजोगाई, जि.बीड यांनी त्यांचे विधिज्ञ ॲड.इस्माईल गवळी यांच्यामार्फत १३ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून काही गंभीर बाबींकडे लक्ष वेधले. त्यांच्या जमिनीचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असतानाही पोलीस व इतर प्रशासनाच्या बळाचा वापर करून, वडिलोपार्जित मिळकतीमधून मला व माझ्या कुटुंबीयांना बेदखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जाजू यांनी केली. या प्रकरणामुळे प्रशासनाकडून लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याचे ॲड.गवळी यावेळी म्हणाले. या प्रकरणी आपण पोलीस महासंचालकांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.