बेपत्ता प्रेमी युगुल सापडले कर्नाटकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:51 PM2019-05-10T23:51:23+5:302019-05-10T23:52:50+5:30
दिवाळीला आत्याच्या घरी आला. आत्याच्या १५ वर्षीय मुलीवर प्रेमाचे जाळे टाकले. तीन महिन्यापूर्वी तिला घेऊन कर्नाटक गाठले. तेथे लग्नही केले. इकडे परळी ग्रामीण ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.
बीड : दिवाळीला आत्याच्या घरी आला. आत्याच्या १५ वर्षीय मुलीवर प्रेमाचे जाळे टाकले. तीन महिन्यापूर्वी तिला घेऊन कर्नाटक गाठले. तेथे लग्नही केले. इकडे परळी ग्रामीण ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला (एएचटीयू) याची माहिती मिळताच त्यांनी गुरूवारी रात्री कर्नाटकातून या जोडप्याला ताब्यात घेऊन परळी ग्रामीण पोलिसांकडे स्वाधीन केले.
शिवाजी नागरगोजे (२१ रा.ब्रह्मवाडी जि.नांदेड) असे आरोपी मुलाचे नाव आहे. शिवाजी हा परळी येथे दिवाळीत आत्याकडे आला होता. याचवेळी त्याचे सीतावर (नाव बदलले) प्रेम जडले. नंतर तो गावी गेला. तरीही सीताच्या आजीच्या मोबाईलवरून त्यांचे बोलणे होत असे. २६ मार्चला तो परळीला आला आणि दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिला अज्ञात ठिकाणी बोलावले. आपण शाळेत जात असल्याची बतावणी देत सीताही घरातून बाहेर पडली. या दोघांनी थेट कर्नाटक गाठले.
हीच माहिती एएचटीयू विभागाला मिळाली. बीडचे पथक दोन दिवसांपासून कर्नाटकात तळ ठोकून होते. गुरूवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी त्यांना परळी येथे आणून ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भारत माने, राणी सानप, पोहेकॉ प्रताप वाळके, शेख शमीम पाशा, नीलावती खटाणे, मीना घोडके, विकास नेवडे यांनी केली.
ट्रकवर चालक म्हणून केले काम
शिवाजी हा यापूर्वी कर्नाटकात उसतोडीसाठी गेला होता. त्यामुळे त्याला कर्नाटक परिसरातील पूर्ण माहिती होती. याच भागात त्याने दोन महिने ट्रक चालक म्हणून काम केले. याच पैशावर त्यांनी उदरनिर्वाह भागविला. मात्र, पोलिसांच्या शोध मोहिमेतून ते सुटले नाहीत.
लग्नाआधीच सैराट जोडपे अडकले पोलिसांच्या बेडीत
कडा : ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ म्हणत आयुष्य एकत्र घालण्याच्या आणाभाका खात धूम ठोकलेले सैराट जोडपे लग्नाच्या दोन दिवस आधीच पोलिसांच्या बैडीत अडकले. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील एका मुलीचे जव्हारवाडी (ता . राहता) येथील मुलाशी सूत जुळले होते. दोघे एकमेकांना वेळ मिळेल तेव्हा फोनवर मनसोक्त बोलत असल्याने दोघांमध्ये आकर्षण वाढले.
हे प्रकरण एवढे टोकाला गेले की मुलीने चक्क प्रियकराला कडा येथे बोलावले. त्यानंतर या सैराट जोडप्याने धूम ठोकत शिर्डी गाठली. आणि एका खाजगी कन्स्ट्रक्शनवर मजुरी करून राहत होते.
दरम्यान मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने आष्टी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून तपास लावत सैराट जोडप्याचा शिर्डी पोलिसांच्या मदतीने शोध घेण्यात आला. बुधवारी रात्री शिर्डी पोलिसांच्या ताब्यातून घेत आरोपी अक्षय शिवराव खरात याला अटक करण्यात आली.
आष्टी पोलीस ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सपोनि साईप्रसाद पवार, पोलीस नाईक मनोज खंडागळे यांनी ही कारवाई करण्यात आली.
पळवून गेलेले सैराट जोडपे हे शिर्डी येथून औरंगाबाद येथे जाऊन शुक्रवारी लग्न करणार होते. पण लग्नाच्या आधीच सैराट जोडप्याला पोलिसांनी ताब्यात घेत अक्षय शिवराव खरात याला अटक करण्यात केली.
गुन्ह्यात आणखी कलम वाढले जातील. तसेच लग्न करणार असल्याची माहिती मिळाली नसल्याचे तपास अधिकारी सपोनि साईप्रसाद पवार यांनी सांगितले.