बसमध्ये विसरलेली मुलगी एका तासात नातेवाईकांच्या स्वाधीन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:15+5:302021-03-04T05:02:15+5:30
केज : चालक- वाहकांचे प्रसंगावधान आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे बसमध्ये विसरलेली चार वर्षांची मुलगी तिच्या नातेवाईकांना एका तासातच स्वाधीन करण्यात ...
केज : चालक- वाहकांचे प्रसंगावधान आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे बसमध्ये विसरलेली चार वर्षांची मुलगी तिच्या नातेवाईकांना एका तासातच स्वाधीन करण्यात आली.
केज येथील सय्यद सादेक रज्जाक यांचे कुटुंब २८ फेब्रुवारी रोजी नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. लग्न आटाेपून हे कुटुंब अंबाजोगाई-औरंगाबाद बसने (क्र. एमएच-१४/बीटी-२५१०) केजकडे येताना त्यांची मुलगी आयेशा शेजारी रिकाम्या आसनावर झोपली. बस केज स्थानकात आल्यानंतर तिचे आई-वडील व नातेवाईक खाली उतरले. आयेशा देखील कुणाबरोबर तरी खाली उतरली असेल असे सर्वांना वाटले. नंतर केज येथून बस पुढे बीडच्या दिशेने निघाली असता वाहक कस्तुरे यांना आयेशा झोपल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रवाशांकडे चौकशी केली; परंतु तिचे नातेवाईक केज येथे उतरल्याचे समजताच वाहक कस्तुरे यांनी चालक मुसळे व प्रवाशांशी चर्चा करून बस परत केज ठाण्यात आणली. पोलीस अंमलदार नखाते यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना दिली. उपस्थित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अनिस, पोलीस कर्मचारी शिवाजी शिनगारे, अशोक गवळी, शिंदे, सतीश बनसोडे आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी आयेशा हिच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला. आयेशाचा फोटो आणि तिची माहिती पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध करताच अल् हुदा फाउंडेशन ग्रुपच्या सदस्यांनी तिची ओळख पटविली. ही माहिती कळविल्यानंतर तिचे वडील सय्यद सादेक रज्जाक हे पोलीस ठाण्यात येताच ओळख पटवून आयेशा हिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अनिस, पोलीस कर्मचारी शिवाजी शिनगारे, नखाते, अशोक गवळी, शिंदे, सतीश बनसोडे वाहक कस्तुरे व चालक मुसळे हे उपस्थित होते.
चालक-वाहक मुसळे व कस्तुरे यांच्या प्रसंगावधानामुळे आयेशा ही अवघ्या एक तासाच्या आत तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन झाली. पोलीस तसेच चालक कस्तुरे व वाहक मुसळे यांच्या सजगतेचे स्वागत होत आहे.