मिशन झीरो डेथ आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:16+5:302021-04-19T04:31:16+5:30
शिरूर कासार : सध्या सुरू असलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सोमवारपासून ‘मिशन झीरो डेथ’ ...
शिरूर कासार : सध्या सुरू असलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सोमवारपासून ‘मिशन झीरो डेथ’ सुरू होणार आहे. यात आरोग्य कर्मचारी ,शिक्षक ,आशा वर्कर यांचा समावेश असून प्रत्येक गाव व प्रत्येक घर कोविडसंदर्भात तपासले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी दिली.
थंडी ,ताप ,खोकला, सर्दी आदी आजार सध्या ‘कोरोना’ चाचणी व भीतीपोटी लपवले जात आहेत तर खासगीत किंवा घरगुती उपाय केले जात असतात. परिणामी या रोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर मृत्यूदरसुध्दा वाढत आहे ही बाब चिंताजनक असल्याने मिशन झीरो डेथ हा उपक्रम सोमवारपासून सुरू होत आहे. याची तयारी झाली असून सर्वे करणाऱ्यांना रविवारी ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे.
तालुक्यात सुमारे १३४ बुथवर २६८ शिक्षक ,१३४ आशा वर्कर ,४१ आरोग्यसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी हा ताफा मिशनवर निघणार असून प्रतिदिनी दररोज १०० कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणाचा अहवाल दररोज दिला जाणार असून पहिल्या सत्रात १३० शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी जमीर शेख , आरोग्य विस्तार अधिकारी तिजोरे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. उर्वरित १३४ शिक्षकांनादेखील हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे जमीर शेख यांनी सांगितले .
मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. सुजाण नागरिकांनी सर्वे करणाऱ्या लोकांना सहकार्य करावे,आजार कुठलाही लपवून न ठेवता सांगितल्यास त्यावर उपचार करणे सोपे होईल, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांनी केले आहे .