बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या ई- मेल आयडीचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 07:13 PM2020-10-14T19:13:27+5:302020-10-14T19:14:01+5:30
Crime News Beed जिल्हा दंडाधिकारी, बीड यांच्या वैयक्तिक इ- मेल आयडीचा गैरवापर करुन मेल पाठवल्याचे समोर आले.
बीड : जिल्हाधिकारी, बीड यांच्या वैयक्तिक ई- मेल आयडीचा गैरवापर करुन पाटोदा तहसील कार्यालयाला खोटा मेल पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाटोद्याच्या तहसीलदारांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ६६ (क) (ड) आयटी अॅक्टसह कलम ४१९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक ई- मेल आयडीचा गैरवापर करुन अज्ञात व्यक्तीने २४ सप्टेंबर रोजी पाटोदा तहसील कार्यालयाच्या मेल आयडीवर एक मेल पाठवला होता. या मेलमधील मेसेजच्या खाली फ्रॉम राहुल रेखावार (आयएएस कलेक्टर तथा डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट) असा मजकूर या मेलमध्ये होता. पाटोद्याचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांना शंका आल्याने त्यांनी याबाबत खात्री केली असता अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, बीड यांच्या वैयक्तिक इ- मेल आयडीचा गैरवापर करुन मेल पाठवल्याचे समोर आले.
या प्रकरणात हा मेल पाठवणाऱ्या आरोपीच्या नावाची खात्री करण्याचा प्रयत्न झाला. मात्र संबंधिताचे नाव समोर आले नाही. अखेर तहसीलदार रमेश् मुंडलोड यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.