रॉकेलचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:30 AM2021-02-05T08:30:14+5:302021-02-05T08:30:14+5:30
गेवराई : गरिबांसाठी रेशन दुकानावर आलेले रॉकेल काळ्या बाजारात जात असून, त्याचा वापर वाहनाचे इंधन म्हणून होत आहे. यामुळे ...
गेवराई : गरिबांसाठी रेशन दुकानावर आलेले रॉकेल काळ्या बाजारात जात असून, त्याचा वापर वाहनाचे इंधन म्हणून होत आहे. यामुळे प्रदूषण वाढत आहे. पुरवठा खात्याचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे रेशनकार्डधारकांना रॉकेल मिळेनासे झाले असल्याचे चित्र आहे.
कामांचा खोळंबा
गेवराई : तालुक्यातील अनेक ठिकाणच्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी इमारती धूळ खात असून, महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. सज्जावर तलाठी राहत नसल्याने कामे होईनासे झाले आहेत.
अवैध धंदे जोमात
पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पान टपरी, तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.
सूचनांकडे दुर्लक्ष
सिरसाळा : सिरसाळा व परिसरातील नागरिकांचा रोज परळीशी संपर्क असतो. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन आवश्यकता नसेल तर परळीला न जाण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीदेखील नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहेत.
जनावरांचा ठिय्याने वाहतुकीस अडथळा
माजलगाव : शहरातील रस्त्यांवर अनेक मार्गावर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा अपघात झाल्याचे देखील उदाहरणे आहेत. ही जनावरे रस्त्यावरून हटवावीत, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून केली जात आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने जनावरांचा धोका वाढत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पर्यावरणास धोका
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे. महसूल, पोलीस प्रशासनाचा वचक न राहिल्याने वाळू उपसा निर्धास्तपणे सुरूच आहे.
अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.