रखडलेल्या रस्त्यामुळे आमदार संतप्त; गुत्तेदार, अभियंत्यांना घडवली खड्डेमय मार्गावरून सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 07:35 PM2022-05-02T19:35:36+5:302022-05-02T19:40:59+5:30

‘आमच्या दररोजच्या हालअपेष्टा तुम्हीही अनुभवा..’ असे म्हणत अर्धवट रस्त्यावरून फिरवले

MLA Namita Mundada give ride to Contractors, engineers on digging pits, dusty roads | रखडलेल्या रस्त्यामुळे आमदार संतप्त; गुत्तेदार, अभियंत्यांना घडवली खड्डेमय मार्गावरून सफर

रखडलेल्या रस्त्यामुळे आमदार संतप्त; गुत्तेदार, अभियंत्यांना घडवली खड्डेमय मार्गावरून सफर

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) : केज मतदार संघातून जाणाऱ्या ५४८-ड या महामार्गाचे काम गुत्तेदाराच्या ढिसाळपणामुळे मागील २ वर्षापासून रखडल्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा सूचना देऊनही गुत्तेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्याने आ. नमिता मुंदडा यांनी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी (दि.०२) बैठक घेतली. बैठकीत गुत्तेदारास तिसऱ्या पट्टीत खडसावत आ. मुंदडा यांनी त्याच्याकडून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणार असल्याचे लेखी पत्र घेतले. त्यानंतर आम्ही मतदार संघातील नागरिक काय काय हालअपेष्टा सहन करतो ते एकदा तुम्हीही अनुभवा असे म्हणत गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडने दुचाकीवरून फिरवले. 

केज मतदार संघातून अंबाजोगाईतील भगवानबाबा चौक ते मांजरसुंबा हा ८२ किमीचा ५४८-ड महामार्ग जातो. याचे काम कोरोनाच्या काळात रखडले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही गुत्तेदाराचा ढिसाळपणा आणि नियोजनाचा अभाव यामुळे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत गुत्तेदाराने रडत-पडत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. मात्र, अंबाजोगाईतील रिंग रोड, येळंबघाट येथील पूल, पुलाच्या बाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण, मार्गातील गावांना जोडणारे ॲप्रोच रस्ते यांचे काम अर्धवट आहे. यामुळे खड्डे, धूळ याचा नागरिकांना प्रचंड त्रास आहे. अनेक अपघात झाले, जवळपास ३८ लोकांचे बळी गेले तरी कामाने वेग पकडला नाही. आ. मुंदडा यांनी आतापर्यंत चार वेळेस बैठक घेऊनही गुत्तेदराने काम त्वरित पूर्ण करण्याची केवळ पोकळ हमी दिली, काम केलेच नाही. 
अखेर, आ. मुंदडा यांनी सोमवारी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, अभियंता यांची उपस्थिती होती. यावेळी महार्गाच्या अभियंत्यांनीही विलंबासाठी गुत्तेदारावर ठपका ठेवला. वेळोवेळी कामाचे देयके देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुत्तेदाराने या कामासाठीचे मनुष्यबळ दुसरीकडे स्थलांतरित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या आ. मुंदडा यांनी गुत्तेदारास खडसावल्यानंतर त्याने अधिक लांबीचे काम, ॲप्रोच रस्तेचे काम ३१ मे पर्यंत, रस्त्याचे राहिलेले छोटे तुकडे ३० जूनपर्यंत पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. 

रखडलेल्या रस्त्यावरून दुचाकी सफर
दरम्यान, माझ्या मतदार संघातील नागरिकांना होणारा त्रास तुम्हीही अनुभवा असे म्हणत आ. मुंदडा यांनी गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडने दुचाकीवरून फेरी मारण्यास भाग पाडले. खड्डे आणि धुळीच्या रस्त्याचे फेरी मारल्यानंतर गुत्तेदाराने दिलगिरी व्यक्त करत काम लवकर पूर्ण करण्याची हमी दिली.

Web Title: MLA Namita Mundada give ride to Contractors, engineers on digging pits, dusty roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.