माजलगावात आमदार पुत्राचे बांधकाम अनधिकृत? नगरविकास खात्याचे चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:40 PM2022-05-30T12:40:51+5:302022-05-30T12:42:00+5:30
माजलगाव शहरातील बायपासवर असलेल्या सर्व्हे नंबर ३७२ मध्ये आ. प्रकाश सोळंके यांचा मुलगा पृथ्वीराज यांच्या नावे असलेल्या जागेवर माजलगाव विकास प्रतिष्ठानमार्फत रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे.
माजलगाव (बीड) : येथील आमदारांच्या मुलाच्या नावावर असलेल्या जागेवर सुरू असलेले बांधकाम अनधिकृत आहे, अशी तक्रार माजी नगराध्यक्षांनी नगरविकास खात्याकडे केली होती. त्याची दखल नगरविकास खात्याने घेऊन आयुक्त कार्यालयाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
माजलगाव शहरातील बायपासवर असलेल्या सर्व्हे नंबर ३७२ मध्ये आ. प्रकाश सोळंके यांचा मुलगा पृथ्वीराज यांच्या नावे असलेल्या जागेवर माजलगाव विकास प्रतिष्ठानमार्फत रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या बांधकाम परवान्याच्या सर्व कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून नियमबाह्य बांधकाम परवाना दिला. विशेष म्हणजे माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या नावावर जागा नसताना नगरपालिकेकडून दोन मजली बांधकाम परवाना दिला आहे. नगरपालिकेचे सर्व कर मात्र पृथ्वीराज सोळंके यांच्या नावाने घेण्यात आले. या पावत्यांमध्येही मालमत्ता क्रमांक चुकीचे व अन्य तफावत आढळून येत आहे. दोन मजली बांधकाम परवाना असताना आजपर्यंत पालिकेकडून पुढील परवानगी न घेता दोनऐवजी पाच मजल्यांचे बांधकाम केल्याची तक्रार शेख मंजूर यांनी २९ मार्च रोजी नगरविकासमंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीत आ. सोळंके मुलाच्या नावे कोट्यवधीचे अनधिकृत पाच मजली बांधकाम करीत असल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यास पाठिंबा देणारे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली होती. दरम्यान, याबाबत आमदार सोळंके व त्यांच्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अहवाल सादर करण्याचे आदेश
४ मे रोजी प्राप्त या तक्रारीची नगरविकास खात्याने दखल घेतली आहे. याबाबत सहायक आयुक्तांनी २३ मे रोजी बीडच्या जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. नियमानुसार कारवाई करीत याचा अहवाल तत्काळ सादर करण्याचा आदेशही आयुक्तांनी दिला आहे.