आमदार ठोंबरे यांनी बस प्रवास करून केला अंबाजोगाई - धावडी या नव्या मार्गाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:36 PM2018-01-08T13:36:43+5:302018-01-08T13:51:57+5:30
आज सकाळी केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांनी चक्क बसने प्रवास केला. निमित्त होते अंबाजोगाई - धावडी बस सेवेच्या सुरुवातीचे.
अंबाजोगाई ( बीड ) : प्रत्येक एसटी बसमध्ये आमदाराच्या नावाची जागा राखीव असते. मात्र याचा वापर झाल्याची बोटावर मोजण्याएवढी देखील उदाहरणे नसतील. परंतु, आज सकाळी केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांनी चक्क बसने प्रवास केला. निमित्त होते अंबाजोगाई - धावडी बस सेवेच्या सुरुवातीचे.
अंबाजोगाई येथून सोनवळापर्यंत जाणारी बस पुढे धावडी पर्यंत न्यावी अशी ग्रामस्थांची अनेक दिवसाची मागणी होती. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, अंबाजोगाईच्या स्वाराती मध्ये येणारे रुग्ण यांची सोय होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. पंचायत समिती सदस्य अॅड. सतीश केंद्रे यांनीही यासाठी पुढाकार घेऊन आ. संगीता ठोंबरे यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर आ. ठोंबरे यांच्या सुचनेवरून आजपासून सदर बस धावडी पर्यंत सुरु करण्यात आली.
या बस सेवेचा शुभारंभ आज सकाळी आ. संगीता ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या आग्रहाला तत्काळ होकार देत आ. ठोंबरे यांनी या बसमधून भावठाना पाटी ते धावडी असा प्रवास देखील केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत भाजपचे हिंदुलाल काकडे, अॅड. सतीश केंद्रे, सचिन वाघमारे आदी उपस्थित होते. चक्क विद्यमान आमदार बसमध्ये बसल्याचे पाहून चालक, वाहकासहित सर्व प्रवाशी देखील आश्चर्यचकित झाले. यानंतर धावडी येथे उतरून आमदार पुढील कार्यक्रमासाठी खाजगी वाहनाने निघून गेल्या. यावेळी आ. ठोंबरे यांच्या साधेपणाचे स्वागत करत बससेवा सुरु केल्याबद्दल धावडी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.