अवैध वाळू तस्करी विरोधात आमदाराचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:57+5:302021-01-20T04:32:57+5:30
तहसील कार्यालयासमोर आंदोलन : ग्रामस्थांसह कार्यकर्ते सहभागी गेवराई : तालुक्यातील सिंदफणा नदी व गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उत्खनन ...
तहसील कार्यालयासमोर आंदोलन : ग्रामस्थांसह कार्यकर्ते सहभागी
गेवराई : तालुक्यातील सिंदफणा नदी व गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उत्खनन करून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्त्याचे नुकसान होऊन, शासनाने वाळू घाटाचे टेंडर काढून वाळूचे दर कमी करून वाहतूक सुरू करावी, या मागणीसाठी आ. लक्ष्मण पवार यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर मंगळवारी आमरण उपोषण सुरू केले.
तालुक्यातील गोदावरी नदी व सिंदफणा नदीतून गेली अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू आहे. पण याकडे प्रशासनातील अधिकारी व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करून थातुरमातुर कारवाई करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तर होत आहे त्याचबरोबर रस्त्यांची वाट लागत आहे. तसेच अवैध वाळू वाहतुकीमुळे आजपर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन बंद करावे या मागणीसाठी आ.लक्ष्मण पवारसह नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, नगरसेवक मुन्ना मोजम, दादासाहेब गिरी,छगन हादगुले, प्रा. शाम कुंड,भरत गायकवाड, जिजा कौचट,भगवान घुबार्डे आदींनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.