बीडच्या विकासकामांत आमदारांकडूनच अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:59+5:302021-09-02T05:12:59+5:30
बीड : शहरात पालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्याचा ध्यास आहे. हक्काचा निधीही आहे; परंतु पालकमंत्री व स्थानिक आमदारांनी हा ...
बीड : शहरात पालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्याचा ध्यास आहे. हक्काचा निधीही आहे; परंतु पालकमंत्री व स्थानिक आमदारांनी हा निधी इतरत्र वळवून विकासकामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे. बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे व पुतण्या संदीप क्षीरसागरांवर गंभीर आरोप केले.
शहरात दलित वस्ती सुधार योजना, डीपी रस्ते, घरकुल योजना आदींसाठी करोडो रुपयांचा निधी आला. त्याची कामेही सुरू करण्यासाठी पालिकेने कारवाई केली; परंतु स्थानिक आमदारांनी त्यात खोडा घातला. सध्या शहराच्या रखडलेल्या विकासास स्थानिक आमदारच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना बीडकरांनी जाब विचारावा, असेही नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पत्र परिषदेत सांगितले. यावेळी नगरसेवकांची उपस्थिती होती.
दरम्यान, याच पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी ही कामे सुरू करण्यासाठी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. यावरही दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.
असा पालकमंत्री पहिल्यांदाच पाहिला
बीड पालिकेने शहराचा विकास केला. मागील ४० वर्षांत खूप पालकमंत्री पाहिले; परंतु जो विकासात खोडा घालतो, पालिकेचा निधी इतरत्र वळवतो, अस पालकमंत्री पहिल्यांदाच पाहिल्याचे म्हणत धनंजय मुंडेवरही डाॅ.क्षीरसागर यांनी निशाणा साधला.