परीक्षा हॉलमध्ये मोबाईल नेण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:47 AM2019-02-21T00:47:49+5:302019-02-21T00:48:13+5:30

महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु होत असून जिल्ह्यातील ३९ हजार १२२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

Mobile access to the examination hall is prohibited | परीक्षा हॉलमध्ये मोबाईल नेण्यास बंदी

परीक्षा हॉलमध्ये मोबाईल नेण्यास बंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु होत असून जिल्ह्यातील ३९ हजार १२२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पुरेशा उपाययोजना केल्या असून परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षक अथवा विद्यार्थी कोणालाही भ्रमणध्वनी संच नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस निरीक्षक मारोती चव्हाण, शिक्षणाधिकारी (मा.) भगवान सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे हे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील २४७ केंद्र संचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी परीक्षेच्या काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी परीक्षा संचालन योग्य प्रकारे घेऊन व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी सूचना दिल्या.
केजपासून धडा काहीच नाही
मागील वर्षी केज येथे परिरक्षक केंद्रात १३०० उत्तर पत्रिका जळाल्या होत्या. यात संबंधित ९ शिक्षकांसह गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित केले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा विभागाने परिरक्षकांना केवळ खोली दुरुस्तीच्या सूचना केल्या. मात्र असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत सुरक्षेच्या दृष्टीने फारसा बदल केलेला दिसत नाही.
परळीत २९३४ परीक्षार्थी
परळी तालुक्यात ८ परीक्षा केंद्रावर २९३४ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना केल्या असून परिक्षेत यावर्षी उशीरा येणा-या विद्यार्थ्यांना परिक्षा देता येणार नसून कॉपीमुक्त परिक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी केले आहे.
आष्टीत १२ केंद्रे
आष्टी तालुक्यातील बारा केंद्रावरुन ४४५९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागू असून सुरळीत परीक्षेसाठी उपाय केल्याचे परिरक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी श्रीराम कणाके,परिवेक्षक देवराव परकारे, गजेंद्र गुडाले यांनी सांगितले.

Web Title: Mobile access to the examination hall is prohibited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.