पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल ‘स्विच आॅफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:56 PM2019-08-19T23:56:05+5:302019-08-19T23:56:35+5:30
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे यांच्याशी नागरिकांचा तात्काळ संपर्क व्हावा यासाठी एकच कायमस्वरुपी मोबाईल नंबर योजना राबवण्यात आली होती. मात्र,अनेक अधिकाऱ्यांचे तसेच पोलीस ठाण्याचे मोबाईल हे ‘स्विच आॅफ’ किंवा ‘नॉट रिचेबल’ आहेत.
बीड : पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे यांच्याशी नागरिकांचा तात्काळ संपर्क व्हावा यासाठी एकच कायमस्वरुपी मोबाईल नंबर योजना राबवण्यात आली होती. मात्र,अनेक अधिकाऱ्यांचे तसेच पोलीस ठाण्याचे मोबाईल हे ‘स्विच आॅफ’ किंवा ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे मोठा गाजावाजा करत सुरु केलेली ही योजना संबंधित अधिकारी व विभागांनी फोल ठरवली असल्याचे दिसून येत आहे.
एखाद्या अडचणीच्या वेळी तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा संबंधित अधिकाºयांशी संपर्क करणे आवश्यक असते. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या-त्या हद्दीतील पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, सह.पोलीस निरीक्षक, दामिनी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, यासह इतर अधिकाºयांना कायमस्वरुपी मोबाईल नंबर दिले होते.
तसेच संबंधित पोलीस अधिकारी बदलून गेले तरी देखील संपर्कसाठी तोच मोबाईल क्रमांक कायम राहणार होता. त्यामुळे नागरिकांना संपर्क करणे सोईचे होणार होते या उद्देशाने शासनाच्या वतीने ही योजना राबवण्यात आली होती. परंतु अनेक ठिकाणी मोबाईल नंबर हे बंद करुन ठेवण्यात आले आहेत. तर काही जणांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, पुन्हा हे सर्व मोबाईल नंबर सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, यासंदर्भात कोणी तक्रार केली तर संबंधितावर कारवाई करु.
सहा उपविभागात काय आढळले ?
जिल्ह्यात बीड, गेवराई, माजलगाव, अंबेजोगाई, केज, आष्टी हे सहा उपविभाग आहेत.
आम्ही त्यांच्याशी शासकीय नंबरवर संपर्क केला, त्यापैकी बीड उपविपोअ यांचा फोन त्यांच्या अंगरक्षकाने उचलला. केजमध्ये स्वत: पोलीस उपाधीक्षक आमले यांनी फोन उचलला इतर ठिकाणी उप विभागीय पोलीस अधिकाºयांचे मोबाईल ‘स्विच आॅफ’ आहेत.
शहरातील सर्व ठाण्याचे प्रमुख पोनी व सपोनी यांनी कायमस्वरुपी असलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर प्रतिसाद दिला. तसेच इतर ठिकाणी ठाणे प्रमुखांनी प्रतिसाद दिला, काही ठिकाणी कॉल उचलले नाहीत.