बीडमध्ये झेडपी अधिका-यांसमोर उधळल्या नकली नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:07 PM2017-11-20T23:07:06+5:302017-11-20T23:08:20+5:30
बीड : पाटोदा तालुक्यातील विविध मागण्यांसाठी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने अधिका-यांच्या दालनाबाहेर व दालनात मुलांच्या खेळातील नोटा उधळून आंदोलन करण्यात ...
बीड : पाटोदा तालुक्यातील विविध मागण्यांसाठी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने अधिका-यांच्या दालनाबाहेर व दालनात मुलांच्या खेळातील नोटा उधळून आंदोलन करण्यात आले. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन झाले.
चुंभळी येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, पाटोद्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी शालेय पोषण आहार योजना व ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठीच्या वसतिगृह योजना तसेच शाळा व्यवस्थापन समिती निवडताना मांडलेला बाजार याबद्दल ग्रामस्थांनी जि. प. च्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार केली होती. तसेच अनेकवेळा निवेदन दिले होते.
जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीमध्ये दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिका-यांनी पात्र लाभार्थ्यांना डावलून अन्याय केला होता. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्यांच्या नावावर जागा नाही त्यांना जागा घेण्यासाठी दिनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. या संदर्भात वारंवार निवेदने देऊनही जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने हे आंदोलन करण्यात आले.
लोकजनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष गोरख झेंड, सुनील जावळे, सुभाष सोनवणे, विठ्ठल पवळ, संतोष गायकवाड, रमेश वारभुवन, श्यामसुंदर वाघमारे, विठ्ठल नाईकवाडे, बापू गायकवाड, दिगांबर उबाळे, बिभीषण गायकवाड, नवनाथ सोनवणेसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणापासून नोटांची झोळी करुन मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने त्यांच्या दालनासमोरुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला. तेथे सीओ साहेब बाहेर या, अशी घोषणाबाजी करीत, काही नोटा उधळल्या. त्यानंतर दालनात प्रवेश करुन नोटा उधळल्या. ग्रामस्थांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्याकडे पुन्हा तक्रार मांडली.
प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी नसल्याने त्यांना याबाबत कळवून कार्यवाहीचे आश्वासन यावेळी देण्यात आले. रीतसर निवेदन आधीच दिल्यामुळे कोणतीही तक्रार उशिरापर्यंत दाखल झाली नव्हती.
शिक्षण समितीचा बाजार मांडला
चुंबळी जि.प. शाळेत पाल्य नसलेल्या पालकाची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करताना सर्रास लिलाव करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे राजीनामे घेऊन नंतर मुख्याध्यापक शरद मुंडे आणि अध्यक्ष अप्पासाहेब पवने यांनी सप्टेंबरमध्ये पोषण आहार, पाल्य वसतिगृह आणि शाळा दुरुस्तीचे पैसे उचलल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.