आधुनिक झाशीची राणी ! एसटी संपामुळे विद्यार्थिनीची शाळेसाठी दररोज १० किमीची घोडेस्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 02:16 PM2021-12-13T14:16:45+5:302021-12-13T14:22:51+5:30
शाळेसाठी दररोज कांगणेवाडी ते उजनी घोड्यावरून प्रवास करणाऱ्या माधवीच्या धाडसाचे होतेय कौतुक
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई (जि. बीड) : पूर्वीच्या काळात कुठलेच वाहन नसल्याने दुसऱ्या गावाला जाण्यासाठी घोड्यावरून जावे लागत असे. आता पुन्हा ते जुने दिवस येतात की काय? असे झाले आहे. एसटीच्या संपामुळे बस बंद असल्याने कांगणेवाडीच्या (ता. अंबाजोगाई) विद्यार्थिनीला उजनीला शाळेत जाण्यासाठी चक्क घोड्यावर बसून पाच किलोमीटर जावे लागत आहे. शाळा सुरू झाल्यापासून तिने शाळा ते घर अशी दररोजची १० किमी घोडेस्वारी सुरू केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेपासून पर्यायाने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. परंतु कांगणेवाडी येथील माधवी कांगणे या विद्यार्थिनीने बस कधी सुरू होतील, याची वाट न बघता आपल्या घरच्या घोड्यावरच शाळेचा रस्ता धरला आहे. माधवीच्या या धाडसाचे शिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी, शाळेचे पर्यवेक्षक आर. एन. लोमटे, शिक्षक लालासाहेब गायकवाड आदींनी कौतुक केले.
घोडेस्वारीचा जोपासला छंद
कांगणेवाडी येथील माधवी दशरथ कांगणे हिला लहानपणापासूनच घोडेस्वारीचा छंद आहे. तिच्या गावात फक्त चौथीपर्यंतच शाळा आहे. त्यामुळे तेथील सर्व विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शिक्षणासाठी पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उजनी या गावी जावे लागते. कोणी बसने तर कोणी सायकलवर या शाळेत जातात. माधवी आपल्या वडिलांबरोबर दुचाकीवर तर कधी बसने उजनीच्या सिध्देश्वर विद्यालयात जात होती. यावर्षी ती सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. परंतु सध्या बसही बंद आहेत अन् पेट्रोलही महागले आहे. त्यामुळे तिने रणरागिणीसारखे धाडस करीत आपल्या घोड्यावरच शाळेत जाण्याचा निर्णय घेतला.
वडिलांनीच दिले धडे
माधवीचे वडील दशरथ कांगणे यांना जेमतेम एक एकर जमीन आहे. शेळी पालनाचाही ते व्यवसाय करतात. पूर्वीपासूनच त्यांना घोडे सांभाळण्याचा छंद आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांना त्यांनी लहान वयातच घोडेस्वारीचे धडे दिले आहेत. त्यामुळे माधवीला लहानपणापासून लगाम हातात धरणे, घोड्यावर बसणे याची सवय आहे. माळेगावच्या यात्रेतून त्यांनी ही घोडी आणली होती. त्यावेळी ती आठ महिन्यांची होती. तिचा सर्वात जास्त सांभाळ व पालन पोषण माधवीनेच केले आहे. तिच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत म्हणून घोड्यावर शाळेत जाण्याची परवानगी दिल्याचे दशरथ कांगणे यांनी सांगितले.
बाजूच्या शेतात बांधते घोडा
मेट्रो शहरातील मुले चित्रात किंवा व्हिडिओत घोडे पाहत असतात. काही जणांना रेसकोर्सवर गेल्यावरच घोडा बघायला मिळतो. परंतु उजनीच्या मुलांना माधवीने आणलेला घोडा रोज बघायला मिळतो. शाळेत येण्यापूर्वी ती आपल्या घोड्याला शाळेच्या शेजारीच असलेल्या शेतातील गोठ्यात बांधते. त्यानंतर शाळेत प्रवेश करते. मात्र, माधवीच्या या धाडसाचे सर्वजण कौतुक करतात.
जबाबदारी पालकांचीच
माधवीच्या वडिलांनी घोड्यावर शाळेत जाण्यासाठी संमती दिली आहे. बसही बंद आहेत. पालकांच्या जबाबदारीवर तिला शाळेत येण्यास परवानगी दिल्याचे शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. बंडगर यांनी सांगितले.
माधवीला शाळेची ओढ
कोरोनामुळे बरेच दिवस झाले शाळा बंद आहेत. शाळा कधी सुरू होतात. अन् कधी एकदाची शाळेत जाते याची ओढ लागली होती. परंतु आता पुन्हा बस बंद आहेत. त्यामुळेच घोड्यावर शाळेत जाण्याचा निर्णय मी घेतला, असे माधवीने सांगितले.