मोदींमुळे विकासप्रश्न मार्गी लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:16 AM2019-10-18T00:16:22+5:302019-10-18T00:17:15+5:30
विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोदी हे निधी कमी पडू देणार नाहीत, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येण्याने आम्हाला खूप आनंद झाला, आमच्या विकासाच्या स्वप्नांना ताकद मिळाली. दुष्काळी जिल्ह्याच्या विकासाची तहान आपल्या आगमनामुळे भागणार आहे. विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोदी हे निधी कमी पडू देणार नाहीत, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
बीड जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर मोदी यांची जाहीर सभा झाली. नरेंद्र मोदी आले की विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देतात हा आपला अनुभव आहे. जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. २०१४ मध्ये रेल्वेसाठी २८०० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी लाखो कोटी रुपयांचा निधी दिला. महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे. आपण महायुतीचे सर्व उमेदवार विजयी करून सत्तेतील टक्का वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह आ. सुरेश धस, आष्टीचे उमेदवार आ. भीमराव धोंडे, बीडचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर, गेवराईचे लक्ष्मण पवार, माजलगावचे उमेदवार रमेश आडसकर, केजच्या उमेदवार नमिता मुंदडा आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, ज्येष्ठ नेते प्रा. टी.पी. मुंडे, तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, नेताजी देशमुख यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
क्षणचित्रे
नरेंद्र मोदी यांची सभा वैद्यनाथ महाविद्यालया समोरील मैदानावर आयोजित करण्यात आली होती, सकाळी ११.३३ वा. हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन झाले.
नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. वैद्यनाथाच्या पावनभूमीत व माझे मित्र गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कर्मभूमीत मी आलो आहे, संताच्या या भूमीत माझा सर्वाना नमस्कार असे म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. मोदींनी ३५ मिनिटे भाषण केले.
पंकजा मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, पती डॉ. अमित पालवे, अॅड. यश:श्री मुंडे यांनी लोकांमध्ये बसून भाषण ऐकले. सूत्रसंचालन खा. प्रीतम मुंडे यांनी केले.
पंकजा मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाची चांदीची पिंड, प्रतिकात्मक रेल्वे देऊन मोदींचा सत्कार केला.