बीडमध्ये व्यापाऱ्याला चिरडणा-या आर्या गँगवर ‘मोक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:40 AM2018-03-31T00:40:51+5:302018-03-31T00:40:51+5:30
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात खून दरोडे, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणा-या कोल्हापुरच्या आर्या गँगवर बीड पोलिसांच्या प्रस्तावाच्या आधारे मोक्का लावण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात खून दरोडे, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणा-या कोल्हापुरच्या आर्या गँगवर बीड पोलिसांच्या प्रस्तावाच्या आधारे मोक्का लावण्यात आला. केज येथील सराफा व्यापाºयाला ठार मारून दागिने लुटल्यानंतर आर्या गँग बीड जिल्ह्यात चर्चेत आली होती. त्यानंतर बीड पोलिसांनी या टोळीच्या म्होरक्यासह चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोक्का लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता.
१४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास केज येथील सराफा व्यापारी विकास गौतम थोरात हे दुकान बंद केल्यानंतर दागिने सोबत घेऊन मोटारसायकलवरून गावाकडे निघाले होते. यावेळी कारमधून आलेल्या अमोल उर्फ आर्या संभाजी मोहिते (वय २६, रा. हसूर, ता. कागल, कोल्हापूर), अमर लक्ष्मण सुतार (वय ३९, रा. निपाणी, बेळगाव, कर्नाटक), महादेव रमेश डोंगरे (वय १९, सोनीजवळा, ता. केज) आणि अतुल रमेश जोगदंड (रा. सोनीजवळा, ता. केज) या चोघांनी थोरात यांना पाठीमागून धडक दिली आणि त्यांच्या जवळील दागिन्याची पिशवी घेऊन पळ काढला. या घटनेत थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र, काही तरुणांच्या धाडसामुळे सदरील चारही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले. हे सर्व आरोपी कुख्यात आर्या गँगचे सदस्य असून अमोल मोहिते हा टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले. तो नेहमी वेगवेगळ्या साथीदारांना सोबत घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खून, दरोडे, चोºया, घरफोड्या खंडणी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असे. त्याच्यावर दोन्ही राज्यात एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर केज येथे दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम वाढविण्यासाठी केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुंबे यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर विचार होऊन भारंबे यांनी सदर टोळीवर मोक्का लावण्यास मंजुरी दिली.
आर्या पडला विहिरीत
थोरात यांना मारल्यानंतर गँगचा म्होरक्या अमोल उर्फ आर्या हा धावताना विहिरीत पडला होता. तो पोलिसांच्या हाती लागल्यामुळेच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अवघ्या चार तासांत यश आले. या गँगवर कोल्हापुरमध्येही मोका लागलेला आहे. ही गँग कुख्यात असून सर्वत्र दहशत आहे.
यांची कामगिरी महत्त्वपूर्ण
या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, वैभव कलूबर्मे, उपअधीक्षक मंदार नाईक, गुन्हे शाखेचे निरीक्षक घनशाम पाळवदे, शिरीष हुंबे आणि केज पोलिसांची भूमिका महत्वाची ठरली. भविष्यातही गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अन्वये कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिला आहे.