‘परिवर्तन’ घोटाळ््यातील संचालक मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:07 AM2019-07-31T01:07:59+5:302019-07-31T01:08:28+5:30
परिवर्तन मल्टीस्टेट व परिवर्तन नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो ठेविदारांना गंडा घालणाऱ्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : परिवर्तन मल्टीस्टेट व परिवर्तन नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो ठेविदारांना गंडा घालणाऱ्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, १८ महिने उलटून देखील यातील फक्त ६ जणांना अटक केली आहे. इतर आरोपी मोकाट असून त्यांना देखील तात्काळ अटक करण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत आहे.
राज्यभरात परिवर्तन मल्टीस्टेट्या माध्यमातून ४ ते ५ हजार ठेविदारांकडून अधिकच्या व्याजदराचे अमिष दाखवून ३६ ते ४० कोटी रुपयांना गंडा घातला होता. ज्यावेळी ठेवीदारांनी पैशासाठी तगादा लावला त्यावेळी मुख्य संचालक अलझेंडे याच्यासह इतर संचालक मंडळातील सदस्यांनी पोबारा केला. त्यांच्याविरुद्ध माजलगावसह इतर ठिकाणी १८ महिन्यापुर्वी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर मुख्य संचालक विजय उर्फ भारत मरीबा अलझेंडे व संचालक मंडळातील इतर ३३ जणांपैकी ६ जण ताब्यात घेतले आहेत, त्यापैकी काही जणांना न्यायालयातून जामीन देखील मंजूर झाला. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी नवीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेण्यासाठी सोमवारी ठेवीदार आले होते. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची भेट घेऊन आपले म्हणणे त्यांच्यापुढे मांडले. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी बैठकीत दिलेले आहेत. ठेवीदारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी यापुर्वी आंदोलन केले होते. पुढील काही दिवसात आरोपींना अटक केली नाही. तर १५ आॅगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.
यावेळी दिपक हिवरेकर, विवेक उरने, बापूराव राजगुरु, प्रकाश ताटे, हसन स्यय्यद मुलानी शेख, रामचंद्र बोराडे, सुष्मा साळुंखे, अलका डहाके, गंगा ढोरमारे, प्रफुल्ल अग्रवाल यांच्यासह इतर ठेवीदार उपस्थित होते.
व्यवस्थापकासह इतर तिघांचा मृत्यू
ठेवीदारांचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून येत असलेला दबावामुळे जामखेड येथील मल्टीस्टेटच्या व्यवस्थापकाचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने व इतर तीन ठेवीदारांचा देखील पैसे मिळणार नसल्याच्या तणावामुळे मृत्यू झाल्याची ठेवीदारांनी यावेळी सांगितले.