बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:25 PM2018-06-06T18:25:01+5:302018-06-06T18:25:01+5:30
बीडसह शेजारील जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीविरोधात बीड पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
बीड : बीडसह शेजारील जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीविरोधात बीड पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीत सात आरोपींचा समावेश असून, दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. इतर पाच जणांचा शोध सुरु आहे.
सौद्या आळकूट उर्फ व्यंकट पवार (रा. हिरडपुरी, ता. पैठण), सोमनाथ उर्फ सोम्या मदल्या भोसले (रा. खंडाळा, ता. पैठण) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. १२ फेब्रुवारी रोजी गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे बद्रीविशाल रामलाल निकम यांना गजाने व काठीने मारहाण करुन त्यांच्याजवळील ७० हजार ७०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. याप्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला स.पो.नि. तडवी यांच्याकडे तपास दिला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एलसीबीचा अनुभव असलेल्या पो. नि. दिनेश आहेर यांच्याकडे सोपविला. त्यांनी स्था. गु. शा. व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या सहाय्याने याप्रकरणाचा पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटकही केली. यासाठी त्यांना गुन्हे शाखेचे पो. नि. घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधकचे स.पो.नि. श्रीकांत उबाळे यांनी मदत केली होती.
या गुन्हेगारी टोळीविरोधात दिनेश आहेर यांनी मोक्का प्रस्ताव तयार करुन २४ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला. जी. श्रीधर यांनी १ जून रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे प्रस्ताव सरकावला. ५ जून रोजी भारंबे यांनी मोक्का अंतर्गत कारवाईची परवानगी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले हे करीत आहेत. उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दीड वर्षात ८ टोळ्यांवर मोक्का
जानेवारी २०१७ पासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ टोळ्यांतील ४० वर आरोपींवर मोक्का काद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये कोल्हापूरची आर्या गँग, आष्टीची पवार - भोसले गँग, बीडची आठवले गँग आदींचा समावेश आहे. याच कालावधीत १४ गुंडांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. ५४ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.