केज विकास संघर्ष समितीचे सोमवारी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:11+5:302021-06-19T04:23:11+5:30
केज : शहरातून जात असलेल्या अहमदपूर-अहमदनगर व खामगाव-पंढरपूर या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने व दर्जाहीन करण्यात येत आहे. ...
केज : शहरातून जात असलेल्या अहमदपूर-अहमदनगर व खामगाव-पंढरपूर या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने व दर्जाहीन करण्यात येत आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या एचपीएम व मेगा कंपन्यांनी तात्काळ कामाची गती वाढवून दर्जेदार काम करावे, या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्यावतीने २१ जून रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा केज विकास संघर्ष समितीने दिला आहे.
केज शहरातून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर व अहमदपूर - अहमदनगर या दोन प्रमुख महामार्गांचे काम चालू आहे. केज शहरअंतर्गत रस्त्याचे काम एखादा आठवडा केल्यानंतर दोन-तीन महिने काम बंद ठेवायचे, अशा प्रकारे दोन्ही कंपन्या काम करत आहेत.
केज-कळंब रस्त्यावर मेगा कंपनीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम रेंगाळलेले आहे. कंपनीने नालीचे बांधकाम पूर्ण केलेले नाही. तसेच जे केले, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच एचपीएम कंपनी अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पिसाटी नदीवरील पुलाचे बांधकाम संथगतीने करत आहे. अशीच परिस्थिती शहरअंतर्गत रस्त्यांच्या कामाची आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने याचा त्रास शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांना होत आहे. त्यामुळे केज शहरअंतर्गत भागातील काम तात्काळ पूर्ण न केल्यास दोन्ही कंपन्यांच्या विरोधात सोमवारी केज विकास संघर्ष समितीच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीमध्ये दुपारी बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे व महेश जाजू यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे.