पैसा झाला खोटा, दहा रुपयांचे नाणे चालेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:24+5:302021-09-22T04:37:24+5:30
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नाण्यांवर बदी नाही. तरीही दहा रुपयांचे नाणे लोक व्यवहारात आणत ...
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नाण्यांवर बदी नाही. तरीही दहा रुपयांचे नाणे लोक व्यवहारात आणत नसल्याने पेच आहे. दहा रुपयांच्या नाण्याबाबत असलेला संभ्रम रिझर्व्ह बँक व बँकांकडून होत असला तरी दहा च्या नाण्यावर विश्वास ठेवायला लोक धजावत नाहीत.
कोणती नाणी नाकारली जातात
सध्या चलनात पन्नास पैसे, एक, दोन, पाच, दहा आणि वीस रुपयांची नाणी आहेत. मात्र पन्नास पैसे व दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास जो तो नकार देत आहे. इतर नाणी मात्र चलनात वापरली जात आहे. तर वीस रुपयांचे नाणे नवे असल्याने चलनात सध्या ते वापरले जाते.
बँकांमध्येही नाण्यांचा मोठा साठा
दहा रूपयांचे नाणे लोक व्यवहारात आणत नसल्याने बहुतांश व्यापारी व नागरिक त्यांच्याकडील नाणी बँकेत जमा करतात. बँकांमध्ये या नाण्याची मोठी आवक होत असल्याने क्वाइन बॅगने स्टोअर रूम भरले आहेत. त्यामुळे इतर करन्सी ठेवायला जागा अपुरी पडत आहे. कोट्यवधींच्या घरात या नाण्यांची किंमत असली तरी त्यांचे वजन मात्र बँकांना झेपत नसल्याची स्थिती आहे.
--------
बीड जिल्ह्याच्या बाहेर दहा रुपयांचे नाणे चलनात आहे. तेथे सुटे पैसे देताना या नाण्याची देवाणघेवाण होते. मात्र बीड जिल्ह्यात या नाण्याद्वारे देवाणघेवाण टाळली जाते. काही बँकांकडून हे नाणे स्वीकारताना क्वाईन काउंटिंग मशीन नसल्याने नाणे मोजण्याचा ताप नको, वेळ व्यर्थ जायला नको म्हणून दहाचे नाणे स्वीकारण्याचे टाळले जाते. - सीताराम बांगड, बीड.
----------
दहा रुपयांचा ठोकळा दुकानदार, विक्रेता कोणीच घेत नाहीत. त्यामुळे माझ्याकडे नाणी असूनही ती व्यवहारात आणता येत नाही. बाहेरगावी गेलो की सुट्या पैशांच्या रूपाने दहा रुपयांचे नाणे दिले जाते. तेथेदेखील दहाचे नाणे आमच्याकडे चालत नाही, असे सांगावे लागते. भाजीविक्रेता, लहान व्यावसायिक, टपरी, हॉटेलवर दहाचे नाणे वापरात आल्यास हे नाणे चलनात फिरू शकेल.
शहादेव जाधव, बीड.
-------------