मुलाच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे चोरट्याने पळवले; प्रतिकार करताना महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:04 PM2020-08-13T17:04:04+5:302020-08-13T17:05:17+5:30
मुलास दहावीत ९५ टक्के मार्क मिळाल्याने तय्च्या पुढील शिक्षणासाठी या दाम्पत्याने रोख रक्कम दोन दिवसापुर्वीच जमा करून घरी ठेवली होती.
परळी : येथील पंचवटीनगरमध्ये चोरट्याने घरफोडी करून रोख 80 हजार रुपये व सोन्याचे दागिने असे एकूण 2 लाख 12 हजाराचा ऐवज पळवला. ही घटना गुरुवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी प्रतिकार करणाऱ्या महिलेस चोरट्याने चाकूने वार करत जखमी केले आहे. दरम्यान, मुलास दहावीत ९५ टक्के मार्क मिळाल्याने तय्च्या पुढील शिक्षणासाठी या दाम्पत्याने रोख रक्कम दोन दिवसापुर्वीच जमा करून घरी ठेवली होती.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, येथील नेहरू चौक भागातील पंचवटीनगरमध्ये बालाजी फड यांचे निवास्थान आहे. बुधवारी रात्री फड कुटुंबीय झोपलेले असताना पहाटे एक चोरटा घरात घुसला. एका रूममधील कपाट उघडून त्याने रोख रक्कम आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी कपाटाचा आवाज येत असल्याने फड यांच्या पत्नी अश्विनी झोपेतून जागे झाल्या. त्यांनी आरडाओरडा करण्याचा पर्यंत केला असता. चोराने त्यांच्यावर चाकूने वार करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यानंतर चोरटा 80 हजार रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला.
जखमी अश्विनी यांनी लागलीच बालाजी फड यांना झोपेतुन उठविले. त्यांनी चोरीची माहिती पोलिसांना दिली. परळी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनास्थळी आंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , परळी शहर पोलीस निरीक्षक हेमंत कदम पोलीस उपनिरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास प्रदीप एकशिंगे हे करीत आहेत.
मुलाच्या शिक्षणासाठी जमा केली होती रक्कम
बालाजी फड यांचे वैद्यनाथ मंदिर समोर चहाचे हॉटेल आहे, मंदिर बंद असल्याने ते हॉटेल ही पाच महिन्यांपासून बंद आहे. दरम्यान, फड यांचा मुलगा दहावी परीक्षेत 95 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. त्याच्या पुढील शिक्षणासाठी पैसे लागतील म्हणून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पैसे जमा केले होते. हे पैसे चोरीला गेल्याने फड कुटुंबासमोर आता मुलाच्या शिक्षणासाठी पैस्यांची सोय कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.