पावसाअभावी पैसा फिरेना, बाजार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:07 AM2019-07-19T00:07:35+5:302019-07-19T00:08:17+5:30

पावसाळी हंगामाचे ४८ दिवस होऊनही समाधानकारक पाऊस नसल्याने कृषी बाजारासह किराणा व इतर व्यावसायाला मोठा फटका बसला आहे.

Money without money due to rain, market hovering | पावसाअभावी पैसा फिरेना, बाजार हवालदिल

पावसाअभावी पैसा फिरेना, बाजार हवालदिल

Next
ठळक मुद्देउलाढाल ठप्प : खते, बियाणे बाजारात ३०० कोटींची गुंतवणूक; किराणासह इतर व्यवसायांना फटका; पुन्हा दुष्काळी सावट

बीड : पावसाळी हंगामाचे ४८ दिवस होऊनही समाधानकारक पाऊस नसल्याने कृषी बाजारासह किराणा व इतर व्यावसायाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी ग्राहकी नाही आणि ग्राहकीअभावी पैसा फिरेना अशा परिस्थितीमुळे बाजार हवालदिल झाला आहे. यातच मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ९५ मिमी पाऊस कमी झाल्याने यंदा आणखी तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागते की काय? अशी स्थिती आहे तर पुढील ७२ दिवसात चांगला पाऊस झाला तरच हे चित्र बदलू शकणार आहे.
कृषी बाजारात या हंगामात एक लाख टन खताची विक्री अपेक्षित होती. मात्र, आतापर्यंत केवळ ४० हजार टन खताची विक्री झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. पावसाअभावी ६० हजार टन खत विक्रेत्यांकडे अद्याप पडून आहे. खताच्या बाजारपेठेत जवळपास दीडशे कोटीची गुंतवणूक झालेली आहे. मात्र, ५० टक्के गुंतवणूक ठप्प झाली आहे. येथील बाजारात विविध १५ कंपन्यांचे खत येते. फेब्रुवारी-मार्चमध्ये खताच्या दरात २० टक्के वाढ झाली होती. त्यानंतर १० जुलैपासून पंधरा टक्के दर कमी झाले आहेत.
बियाणे बाजारातही शुकशुकाट आहे. कपाशीच्या नऊ लाख पाकिटांपैकी पैकी केवळ सात लाख पाकिटांची विक्री झाली आहे. कपाशी बियाणांची २ लाख पाकिटे बाजारात पडून आहेत. बाजारात ७५ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणेआले होते. मात्र विक्री केवळ ४० हजार क्विंटल झाली आहे. ३५ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे शिल्लक आहे. याशिवाय इतर बियाणे तसेच पडून आहेत. बियाणांच्या बाजारपेठेत जवळपास दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. मात्र, विक्री पाहता हे प्रमाण केवळ ५० टक्के इतकेच आहे. त्यामुळे बियाणे बाजारातील ७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करायचे काय? याची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे.
जिल्ह्यात कमी अधिक परंतू १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेला असताना चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी २५ जूनदरम्यान पेरण्या केल्या. मोजकेच दिवस वर्दळ दिसली. २८ जूनपासून मात्र होती ती ग्राहकीही ओसरली. पावसाने मोठा खंड दिल्याने त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या कृषी बाजारात व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करीत बसले आहेत. मात्र पाऊसच नसल्याने बाजारात ग्राहकही दिसेना अशी परिस्थिती आहे. पाऊस नसल्याचा फटका कापडासह इतर व्यवसायालाही बसला आहे.
बाजारातील या परिस्थितीचा फटका व्यापारी, शेतकºयांबरोबरच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हमाल आणि कामगारांना बसला आहे. बाजारात आवक जावक थंडावल्याने हमालांना बुरे दिन आले आहेत. मागील दुष्काळी महिन्यातही काही प्रमाणात आवक जावक होत होती. त्यामुळे दिवसाकाठी ५० ते ६०० रुपये हमाली मिळायची. मागील तीन हप्त्यात आवक-जावक ठप्प असल्याने दिवसाला ४०-५० रुपये मजुरी हाती पडत असल्याचे श्रमिक अशोक माने यांनी सांगितले. बारीश-पानी हुआ तो सब ठीक ठाक होगा साब. पाऊसच नसल्याने दिवसभर असेच बसावे लागते असे किराणा बाजारातील हमाल अब्बास भाई यांनी सांगितले. पाऊस नसल्याचा फटका कापडासह इतर व्यवसायालाही बसला आहे.
बीड जिल्हा पाऊस (१ जून ते १८ जुलै)
पाऊस मिमी - बीड १०४, पाटोदा १३८.८, आष्टी १०५.१, गेवराई ७४.५, शिरुर ८३.३, वडवणी ९०, अंबाजोगाई ८३.८, माजलगाव १३१.१, केज ९९.६, धारुर ९५, परळी ७०.६ (एकूण सरासरी पाऊस ९७.८ मिमी) (गतवर्षी याच कालावधीत १९३. ४ मिमी पाऊस नोंदला होता.)

Web Title: Money without money due to rain, market hovering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.