सावकाराने हडपली मयताची जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:41 AM2018-11-28T00:41:36+5:302018-11-28T00:41:59+5:30

व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडेचार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे समोर आला

Moneylender's fraud,enchroched dead person's land | सावकाराने हडपली मयताची जमीन

सावकाराने हडपली मयताची जमीन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडेचार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे समोर आला आहे. याप्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून दिंद्रूड पोलीस ठाण्यात सावकार भावंडांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या चौकशीसाठी एक तीन सदस्यीय समितीही नियूक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. दरम्यान, यामध्ये आणखी लोकांची जमीन हडपल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विलास व दत्तात्रय अंगदराव फपाळ (रा.बेलुरा ह.मु.शाहूनगर, माजलगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रामेश्वर गंगाराम उबाळे (रा.दिंद्रूड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मयत भाऊ शिवाजी यांना व्यसन होते. या व्यसनापायी त्यांनी काही कर्ज घेतले होते. २०१० साली त्यांनी आपल्या नावे असलेली जमीन विलास फपाळ यांच्याकडे तारण म्हणून ठेवली. २०१२ साली हा प्रकार त्यांनी कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी शिवाजी यांनी चक्रीवाढ व्याजासह १ लाख ८६ हजार रूपये कर्जाची परतफेड केली होती. त्यानंतर विलास यांनी ही जमीन परत करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ही जमीन कोणालाही कल्पना न देता आपला भाऊ दत्तात्रय यांच्या नावावर केली. हा प्रकार समजल्यावर रामेश्वर यांनी दिंद्रूड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून विलास व दत्तात्रय यांच्याविरोधात ४२०, ४१७, ४१८, ५०६, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तपास सहा.पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके या करीत आहेत. सपोनि सचिन पुंडगे हे सहकार्य करीत आहेत.
घाबरू नका, तक्रार देण्यास पुढे या
या प्रकरणात आणखी काही लोकांची जमीन गहाणखत म्हणून ठेवून घेत ती आपल्या नावावर केल्याचे बोलल जात आहे. तसेच यातील आरोपींना राजकीय पाठबळ व गावात दहशत असल्यामुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे धजावत नाहीत.
मात्र आता गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत आणून आपल्या तक्रारीवर ठाम राहण्यासंदर्भातही पोलिसांनी आवाहन केले आहे.
त्रिसदस्यीय समिती नियुक्त
कर्ज, जमीन व सावकारीची माहिती काढण्यासाठी आणि आणखी किती लोकांची जमीन हडपली, हे समोर आणण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. यामध्ये सहायक निबंधक, तहसीलदार एन.जी.झंपलवाड व दिंद्रूड ठाण्याचे सपोनि सचिन पुंडगे यांचा समावेश आहे. ही समिती पंचनामा व इतर माहिती जमा करून सहायक अधीक्षक नवटके यांच्याकडे अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Web Title: Moneylender's fraud,enchroched dead person's land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.