वानरांच्या सुडसत्राला लगाम ! नागपूर वन विभागाच्या पथकाने दोन तासातच पकडली दोन वानरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 10:34 AM2021-12-18T10:34:42+5:302021-12-18T10:39:45+5:30
कुत्र्याने वानरांचे पिल्लू मारल्याने वानरांनी सुरू केलेल्या सूडचक्राला यामुळे अखेर लगाम बसल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
माजलगाव : कुत्र्याच्या पिल्लाला उचलून घेऊन जात त्यांना उंचावून फेकून देत मारल्याच्या अनेक घटनांनंतर वानरे मुलांनाही उचलून घेऊन गेल्याचे प्रकार तालुक्यातील लवूळ येथे मागील दोन तीन महिन्यांपासून सुरू होते. या उपद्रवी दोन वानरांना नागपूरच्या वन विभागाच्या पथकाने आज सकाळी दोन तासातच पिंजऱ्यात जेरबंद केले. कुत्र्याने वानरांचे पिल्लू मारल्याने वानरांनी सुरू केलेल्या सूडचक्राला यामुळे अखेर लगाम बसल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत सुटकेचा निःश्वास सोडला.
लऊळ याठिकाणी मागील दोन ते तीन महिन्यापासून तीन वानरांनी धुमाकूळ घालत आणि श्वानांच्या पिल्लांना उचलून घेऊन जात त्यांना मारल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर हे वानर गावातील मुलांना देखील उचलल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे गावात दहशत पसरली होती. या घटनेचा लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता. यानंतर शुक्रवारी धारूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन नागपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते.
नागपूर येथील एक टीमने शनिवारी पहाटे येऊन वानरांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. या जाळीत दोन श्वानांचे पिल्ले ठेवल्यानंतर ते वानर जाळ्यात आले. या टीमने केवळ दोन तासात या वानरांना जाळ्यात घेतले. वानरांना पकडताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावकऱ्यांनी नागपूरच्या टीमचे अभिनंदन केले.
कुत्र्यांनी मारले होते वानराचे पिल्लू
या वानरांच्या एका पिल्लाला लवुळ गावातील कुत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मारून टाकले होते. यामुळे रागाच्या भरात ही वानरे गावातील कुत्र्यांच्या पिलांना मारून टाकत आहेत, असे येथील ग्रामस्थ सांगतात.
अनेक जण जखमी
लवुळ गावातील सीताराम नायबळ यांच्या कुत्र्याच्या पिलाला १५ दिवसांपूर्वी वानर घेऊन गेले होते. नायबळ यांनी गच्चीवर जाऊन पिल्लाला सोडविण्याचा प्रयत्न केला असता वानर त्यांच्या अंगावर धावून आले. त्यात नायबळ गच्चीवरून खाली पडले आणि त्यांचा पाय मोडला. याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.
श्वानानंतर लहान मुले टार्गेट
गावातील कुत्र्यांच्या पिल्लांची संख्या कमी झाल्याने आता वानरांनी आपला मोर्चा लहान मुलांकडे वळवला. संतराम शिंदे यांच्या आठ वर्षांच्या नातवाला वानराने उचलून पत्र्यावर नेले होते. नागरिकांनी दगड व काठ्या उगारल्याने बालकास सोडून पळून गेले. ही वानरे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या पाठीमागे लागत, काही महिलांना त्याने मारल्याच्या घटनाही घडल्या.