अंबाजोगाईत महिनाभरात आढळले ५६७१ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:02+5:302021-05-07T04:35:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा प्रत्येक दिवशी वाढतच चालला आहे. आजपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येत एप्रिल महिन्याने उच्चांक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा प्रत्येक दिवशी वाढतच चालला आहे. आजपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येत एप्रिल महिन्याने उच्चांक गाठला. एप्रिलच्या ३० दिवसात एकूण ५,६७१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. गेल्या दहा महिन्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ५५ टक्के रुग्ण फक्त एप्रिल महिन्यात सापडल्याने हा महिना अंबाजोगाई तालुक्यासाठी धोकादायक ठरला.
अंबाजोगाई तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. गेल्या दोन महिन्यांत दररोजच्या रुग्णसंख्येने दररोज तीन अंकी आकडा पार केला आहे. अंबाजोगाई शहरासोबत ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढली आहे. शासनाने कडक निर्बंध लादूनही नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन सुरू असल्याने आगामी काळात स्थिती अजूनही गंभीर होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मार्च महिन्यात १ हजार रुग्ण कोरोनाबाधित निघाले तर एप्रिलच्या ३० दिवसात ५,६७१ जण कोरोनाबाधित आढळले. हे प्रमाण ५५ टक्के इतके आहेत.
आतापर्यंत तालुक्यात १० महिन्यात १० हजार ७८० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. अशी भयावह स्थिती असतानाही नागरिकांना याचे गांभीर्य नाही. सार्वजनिक ठिकाणी अजूनही वाढती गर्दी कायम राहिल्याने संभाव्य धोका वाढला आहे. तर शहरवासियांना कोरोनाच्या त्रिसुत्रीचा विसर पडला आहे.
कोरोनाला प्रारंभ झाल्यापासून जूनपर्यंत अंबाजोगाईत कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र, गेल्या दहा महिन्यांत अंबाजोगाई तालुक्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. शासनाने बाजार बंद केले असले तरी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे विक्रेते कसल्याही प्रकारचे बंधन पाळत नसल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. शासनाने विनामास्क फिरणाऱ्यांकडून लाख रुपये दंड वसूल केला तरी परिस्थिती ‘जैसे थे’च होऊ लागली आहे. अशीच स्थिती राहिली तर अंबाजोगाई शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा पर्याय शासनासमोर राहील.
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अंबाजोगाईच्या स्वा. रा. ती. रुग्णालयात व लोखंडी येथील कोविड रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या आहे. शहरातील नागरिकांनी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचे पालन व्यवस्थित न केल्यास शहरासाठी कठोर उपाययोजना लागू करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तर कायदेशीर कारवाई
वेळीच गांभीर्य बाळगून कोरोनाच्या त्रिसुत्रीचा अवलंब करावा. कडक लॉकडाऊनसारख्या पर्यायाला सामोरे जावूनही नागरिक त्रिसुत्रीकडे दुर्लक्ष करत असतील तर आगामी काळात मास्क न वापरणे, शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - विपिन पाटील, तहसीलदार
१० महिन्यात आढळलेले कोरोनाबाधित रूग्ण १०७८०
मार्चमध्ये आढळलेले रूग्ण १०००
एप्रिल २०२१मध्ये आढळलेले बाधित रूग्ण ५६७१
५५ टक्के रूग्ण केवळ एका महिन्यात आढळले