'८० लाखांत नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण'; अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस आला होता एजंटचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 03:50 PM2024-06-29T15:50:14+5:302024-06-29T15:55:01+5:30
‘तुला अभ्यास करण्याची गरज नाही. आम्ही परीक्षा केंद्रांसह सर्व काही मॅनेज करतो. मात्र, यासाठी तुला ८० लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील’
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : तुला नीट परीक्षेत ६५० पेक्षा जास्त गुण मिळतील. तुझा चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागेल. मात्र, यासाठी तुला ८० लाख रुपये द्यावे लागतील, असा फोन सलग दोन वेळा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस दलालामार्फत आला होता. हा प्रकार त्या मुलीने नीट परीक्षेतील पेपर फुटीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर आपल्या पालकांना सांगितला.
अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते तारेखअली उस्मानी यांची मुलगी हैदराबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेते. ती यावर्षी नीट परीक्षेसाठी बसली होती. तिचा परीक्षेचा अभ्यासही सुरू होता. तिने परीक्षा फॉर्म भरून दिला. याच कालावधीत परीक्षेपूर्वी तिला एका दलालाचा फोन आला. ‘तुला आम्ही नीट परीक्षेत ६५०पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ, तुझा चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागेल. अभ्यास करण्याची गरज नाही. आम्ही परीक्षा केंद्रांसह सर्व काही मॅनेज करतो. मात्र, यासाठी तुला ८० लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील,’ असा फोन आला.
परंतु, त्या विद्यार्थिनीने काहीही प्रतिसाद दिला नाही. परत दलालाचा फोन आला. तरीही तिने या गोष्टीस नकार दिला. जेव्हा नीट परीक्षेतील सावळा गोंधळ सुरू झाला, त्यावेळी ही बाब त्या मुलीने आपल्या वडिलांना सांगितली व या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली. दरम्यान, अशा प्रकारचे आमिष अंबाजोगाईतील आणखी दोन ते तीन पालकांनाही दाखविण्यात आले असल्याचे समोर आले आहे. मात्र, नको ती भानगड, यामुळे अनेक पालकांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.