‘स्वाराती’च्या प्रयोगशाळेत १४ महिन्यांत तीन लाखांहून अधिक कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:31+5:302021-08-24T04:37:31+5:30
अंबाजोगाई : कोरोना महामारीच्या संकटात आरटीपीसीआर तपासणीद्वारे कोरोनाचे निदान करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र ...
अंबाजोगाई : कोरोना महामारीच्या संकटात आरटीपीसीआर तपासणीद्वारे कोरोनाचे निदान करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागांतर्गत असलेल्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेत १४ महिन्यांत तीन लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या.
पालकमंत्री धनंजय मुंडे, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आरोग्य संचालकांच्या प्रयत्नांतून आणि तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वातून तालुकास्तरावर स्वाराती रुग्णालयात महाराष्ट्रातील एकमेव कोरोना निदान प्रयोगशाळेला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाकडून प्रयोगशाळेसाठी तीन कोटींचा निधी मिळाला. त्यानंतर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आर.एन.ए. एक्स्ट्राक्शन किट्स, आरटीपीसीआर किट्स व कन्झुमेबल्स उपलब्ध करण्यात आले. यामुळे सुरुवातीला बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना तपासणी व त्यानंतर बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील कोरोना तपासणी व त्यांनतर बीड जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणी शक्य झाली. सुरुवातीला लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अहवाल प्राप्तीसाठी ३६ ते ४८ तास लागत असत; परंतु स्वाराती ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या प्रयोगशाळेत नमुन्याची नोंद झाल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत अहवाल (रिपोर्ट) प्राप्त होत आहेत. एकाही नमुन्याचा अहवाल या प्रयोगशाळेमार्फत प्रलंबित ठेवला गेला नाही. तालुका ठिकाणी असलेल्या स्वाराती ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत २१ ऑगस्टपर्यंत ३ लाख तपासण्या पूर्ण केल्या आहेत. अंबाजोगाईची प्रयोगशाळा गुणवत्तेत अव्वल
आयसीएमआर दिल्ली व एम्स नागपूर यांच्या तपासणीत अंबाजोगाईची व्हीआरडीएल लॅब गुणवत्तापूर्ण व अव्वल राहिली आहे. १४ महिन्यांपासून लॅबमधील कोणीही काेरोनाग्रस्त झाले नाहीत. सर्व तपासण्या या योग्य काळजी घेऊन, तसेच लॅबचे निर्जंतुकीकरण करून केले जाते. सॅम्पल तपासणी व अचूक निदानाच्या बाबतीत ही प्रयोगशाळा मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळ
या प्रयोगशाळेत २१ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ०९ डेटा एन्ट्री ऑपरेटर व ०३ वर्ग-४ कर्मचारी, तसेच विभागप्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. संदीप निळेकर, लॅब इंचार्ज डॉ. दीपाली कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. राजेश ओव्हाळ, डॉ. चारुशीला हलगरकर, डॉ. आशा बोईनवाड, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. अर्जुन जाधव, डॉ. अमित लोमटे व डॉ. सीमा काटोले या तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळावर व्हीआरडीएल प्रयोगशाळा सुरू केली होती.
तत्पर सेवा दिल्याचे समाधान
१४ महिन्यांपासून ते आजपर्यंत तब्बल तीन लाख तपासण्यांचे ध्येय गाठण्यात आले. हे सर्वांचे सहकार्य व टीमवर्क आहे. तत्पर तपासणी करून योग्य निदान झाल्यास, तसेच आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णांच्या उपचारासाठी कोणते औषध द्यायचे हे ठरवणे शक्य होते. रुग्णांना तत्पर सेवा देता आली याचे समाधान आहे. -डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय, अंबाजोगाई