३०० लेकरांची माय ; बीड जिल्ह्यातील ‘शांतीवन’चा प्रेरणादायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 07:10 AM2019-05-12T07:10:11+5:302019-05-12T07:15:04+5:30
संकट, वेदना, संघर्षावर मात करून ३०० लेकरांचा सांभाळ करून दिली मायेची ऊब
- सोमनाथ खताळ
बीड : अडचणीच्या काळात दुकानदार साहित्य उधार देत नव्हते. संक्रांतीला मुलांना गोड जेवण देण्यासाठी काय करावे, असा प्रश्न होता. यावर कसलाही विचार न करता गळ्यातील मंगळसूत्र विकले आणि संक्रांत गोड केली. संकट, वेदना, संघर्षावर मात करून ३०० लेकरांचा सांभाळ करून मायेची ऊब देण्यासह त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य फुलविण्याचे काम आर्वी (ता.शिरूर, जि.बीड) येथील शांतीवन करीत आहे. या प्रकल्पाच्या संचालिका कावेरी दीपक नागरगोजे यांचा हा संघर्षमय प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
कावेरी या उच्चशिक्षित. घरची परिस्थिती हलाखीची. सुरूवातीपासूनच नशिबी संघर्ष होता. त्यातच २००० साली मामाचा मुलगा असणाऱ्या दीपक नागरगोजे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर काही जोडपी फिरण्यासाठी परराज्यात, परदेशात जातात. हे दोघेही बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेले. तेथील काम समजून घेतले. ते पाहून ते प्रेरित झाले. त्यांनी बाबांजवळ आनंदवनातच काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांनी नकार दिला. आपल्या परिसरात जा, तेथे काय समस्या आहेत, त्या जाणून घ्या आणि त्यावर काम करा, असा मोलाचा सल्ला दिला. त्याप्रमाणे कावेरी व दीपक दोघेही गावी आले. चार दिवस विचार केला. सामाजिक काम करण्याचे मनाशी ठाम केले आणि २ महिने फिरून पाहणी केली. यामध्ये त्यांना उसतोड कामगार, गरीब, शेतकरी, वंचित, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, तमाशा कलावंतांच्या मुलांची परिस्थिती समजली. त्यांनी २००१ साली ‘शांतीवन’ हा प्रकल्प सुरू केला. सुरुवातीला ५१ मुले होती. तेव्हा केवळ वसतिगृह होते. आता एकूण ३०० मुले (त्यात ८५ मुली) असून १ ली ते १० वी पर्यंत शाळा आणि सर्वांना राहण्यासाठी सुसज्ज असे वसतिगृह आहे. अडचणींवर मात करीत संघर्ष करून उभारलेला हा प्रकल्प कावेरी दीपक नागरगोजे सक्षमपणे चालवित आहेत.
पतीसह सासूबार्इंचे पाठबळ
हा प्रकल्प उभारताना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी पती दीपक यांचे मोठे पाठबळ होते. तसेच सासू रजनी नागरगोजे यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाखमोलाचे ठरले. तसेच सामाजिक कार्यकर्ते भगवान भांगे यांनीही सहकार्य केले.
शेततलावातून दुष्काळावर मात
सुरूवातीला १० वर्षे खूप अडचणी आल्या. दुष्काळी परिस्थिती. पाण्याचा प्रश्न गंभीर होता. याच वेळी पुण्याचे सुलभा व सुरेश जोशी हे शांतीवनात आले. त्यांनी दाता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पुण्याचे शशिकांत चितळे यांना प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी प्रकल्पासाठी २५ लाख रूपयांची मदत केली. याच पैशांतून दोन एकरांत शेततलाव खोदला. याच पाण्यावर भाजीपाला पिकविला. त्यामुळे खूप खर्च वाचला. याच खर्चातून मुलांना चांगल्या सुविधा दिल्या.
७ मुले बनताहेत डॉक्टर
ज्या मुलांना स्वत:चे कपडे घालता येत नाहीत, त्यांच्यापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कावेरी यांनी मातेचे प्रेम दिले. शांतीवनातील शिक्षण संपल्यावर त्यांना अर्ध्यावर सोडून न देता त्यांचा पुढील शिक्षणाचा आणि राहण्या, खाण्याचा खर्चही केला जातो. आज याच प्रकल्पातील सात मुले एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. इतर शाखांचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी धरले पाय
सुरुवातीला मुले आर्वी गावातील शाळेत जात होती. मात्र काही लोकांनी त्यांच्या शिक्षणाला विरोध केला. काहींनी उपोषणे केली तर काहींनी शासनाकडे तक्रारी केल्या. यावेळी अनेक वेळा शिक्षक, ग्रामस्थांचे पाय धरावे लागले. मात्र कोणी ऐकले नाही. पण आम्ही खचलो नाहीत. यावर मात केली आणि मुलांना शिक्षण दिले, असे कावेरी यांनी सांगितले.
मी त्यावेळी मंगळसूत्र मोडून मुलांना संक्रांतीच्या दिवशी गोड जेवण दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यातच मी माझे मंगळसूत्र पाहिले. खूप संघर्ष केला. पण आज त्याचे फळ मिळाले. सामाजिक काम केल्याचे समाधान करोडो रूपयांपेक्षा जास्त आहे.
- कावेरी दीपक नागरगोजे संचालिका, शांतीवन प्रकल्प, आर्वी ता.शिरूर, जि.बीड