हृदयद्रावक! गोंडस बाळाला जन्म दिला, चेहरा पाहण्याआधी आईने जगाचा निरोप घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:28 IST2025-04-14T12:27:55+5:302025-04-14T12:28:50+5:30
निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी मृत महिलेचा भाऊ आकाश कळसकर याने केली आहे.

हृदयद्रावक! गोंडस बाळाला जन्म दिला, चेहरा पाहण्याआधी आईने जगाचा निरोप घेतला
बीड - जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या मातेने गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु बाळाचा रडण्याचा पहिला आवाज कानी पडण्याआधीच व त्याचा चेहरा पाहण्याआधीच आईने या जगाचा निरोप घेतला. ही घटना जिल्हा रुग्णालयात १३ एप्रिलच्या पहाटे ३ वाजता घडली आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर या प्रकरणी चौकशीसाठी ५ डॉक्टरांची समिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी नेमली आहे. नवजात बाळ सुखरूप असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बीडलगत बहिरवाडीच्या सिद्धेश्वर नगर येथील माहेर असलेली छाया गणेश पांचाळ ही महिला ११ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली.
१२ एप्रिलच्या रात्री तिने गोंडस मुलाला जन्म दिला. पती गणेश, ३ वर्षाची मुलगी, आई सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. परंतु प्रसूतीनंतर मातेची प्रकृती रक्तस्त्रावामुळे खालावत गेली. दोन तासांतच तिची प्राणज्योत मालवली. बहिणीला रक्तस्त्राव सुरू झाला. आईने तेथील नर्सला सांगितले असता नर्सने रक्त पिशवी आणण्यासाठी आईला पाठवले. आई रक्ताची पिशवी आणण्यासाठी बाहेर गेली. आईने दरवाजा वाजवला परंतु डॉक्टर उठले नाहीत. रक्त घेऊन येईपर्यंत बहिणीचा मृत्यू झाला. निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी मृत महिलेचा भाऊ आकाश कळसकर याने केली आहे.
काय घडला प्रकार?
प्रसूतीनंतर आपल्याला मुलगा झाल्याचा आनंद छायाच्या चेहऱ्यावर दिसत होता. तिने बिस्किटही खाल्ले, परंतु काही वेळाने तिला रक्तस्त्राव सुरू झाला. ही बाब तिच्या आईने तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तेथील एका परिचारिकेने मी घरी जाते, तुम्हीच उपचार करा असं उद्धटपणे म्हटले. मुलीच्या त्रासाची व्यथा मांडणाऱ्या आईचे कुणी ऐकले नाही. कोणीही हालचाल केली नाही असं मयत छायाच्या नातेवाईकांनी सांगितले. मदतीच्या आशेने छायाचा जीव कासावीस होत होता. एका तासांतच तिने प्राण सोडले. संबंधित डॉक्टर, परिचालिकेच्या हलगर्जीपणामुळे छायाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
मुलाला काचेतून आईचे स्वप्न बघावे लागणार
दरम्यान, डॉक्टरांनी मुलगा झाल्याचे सांगितल्यावर छायाच्या पतीने आणि नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मिठाईसाठी पैसे वाटले परंतु मिठाईचा गोडवा काही तासांत दु:खात बदलला. नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला. तर नातेवाईकांच्या मागणीप्रमाणे डॉक्टरांची टीम चौकशीसाठी तयार केली आहे. त्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन होणार असून मृत्यूचे कारण त्यानंतर कळेल. यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच पैसे मागितल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे त्याचीही चौकशी केली जाणार आहे असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी सांगितले.