सासू-सुनेच्या जोडीची कमाल; घराच्या छतावरील भाजीपाला रोपवाटिकेतून लाखोंची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:09 PM2022-12-15T19:09:27+5:302022-12-15T19:13:31+5:30
कडा येथील महिला शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग
- नितीन कांबळे
कडा (जि. बीड): पाटाभर शेती नसताना उच्चशिक्षित पती-पत्नीने नोकरीच्या मागे न लागता अंगठेबहाद्दर आईच्या मदतीने घराच्या छतावर विविध भाजीपाल्याची रोपे, घरच्या घरी तयार करून रोजगार मिळवला. त्यातून प्रगती साधली. पाच वर्षांत २५ लाख रोपांतून पाच लाखांचे उत्पन्न मिळवत कडा येथील भोजने कुटुंबाने यशस्वी प्रयोग करत आर्थिक प्रगती साधली आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील यमुनाबाई भोजने या अंगठेबहाद्दर असताना मुलाला उच्च शिक्षण दिले. नंतर मुलाचे बी.एड. झालेल्या मनीषा हिच्याशी लग्न लावले. घरी पाटाभर शेती नसताना शेतीविषयी आवड असल्याने संजय भोजने यांनी पुणे जिल्ह्यात रोपे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी देत अनुभव घेतला. २०१८ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथून कोकोपीठ विकत घेऊन तो ट्रेमध्ये भरून त्यात टोमॅटो, वांगे, मिरची, प्लाॅवर, कोंबी, शेवगा, पपई आदी रोपे घरी आई व पत्नीच्या मदतीने तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी स्वतंत्र बोअर घेऊन त्याचे पाणी टाकीत सोडून वरच्या वर रोपाला दिले. यातून दरवर्षी ५ लाख रोपे तयार केले जातात. साधारण ४५ दिवसांत हे रोपे तयार होतात. ही रोपे कडा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका दुकानात ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांना एक ते दीड रुपयांप्रमाणे विक्री केली जातात. घरच्या घरी रोजगार उपलब्ध केला.
वर्षाला लाखाचे उत्पन्न
पती-पत्नी उच्चशिक्षित असताना नोकरीच्या मागे न लागता आईच्या मार्गदर्शनाने हा व्यवसाय उभा केला. पाच वर्षांत २५ लाख रोपे तयार करून त्यांची विक्री करीत ५ लाख रुपये उत्पन्न मिळवले. ५ लाख रोपे तयार करण्यासाठी ४ लाख खर्च येतो. यातून वर्षाकाठी १ लाख रूपये मिळतात.
हक्काचा व्यवसाय उभारावा
घराच्या छतावर भाजीपाल्याची रोपे तयार करून घरच्या घरी रोजगार उपलब्ध करीत गावातच विक्री करून यशस्वी प्रयोग केल्याने आर्थिक उत्पन्न चांगले मिळत आहे. तरुणांनी शिक्षण घेतल्यावर लाखो रुपये गुंतवणूक करत नोकरीच्या मागे न लागता हक्काचा व्यवसाय उभारावा, असे आवाहन उच्चशिक्षित मनीषा व संजय भोजने यांनी केले आहे.