ग्रामपंचायतच्या आखाड्यात सासू - सून आमनेसामने; आरणवाडीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 03:41 PM2022-12-16T15:41:21+5:302022-12-16T15:41:38+5:30
धारूर तालुक्यात आरणवाडी हे गाव शिक्षण, शेतीच्या उत्पन्नासह प्रत्येक बाबतीत प्रगतशील आहे.
- अनिल महाजन
धारूर (बीड) : तालुक्यातील आरणवाडी ग्रामपंचायतच्या ७ जागांसाठी येत्या रविवारी मतदान होणार आहे. या निवडणूकीत वार्ड क्रमांक एक मध्ये सासु- सुन आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. त्यांच्यात काट्याची टक्कर होत असून, कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सुनेला निवडणूक आणण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील शिनगारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
धारूर तालुक्यात आरणवाडी हे गाव शिक्षण, शेतीच्या उत्पन्नासह प्रत्येक बाबतीत प्रगतशील आहे. ग्रामपंचायतसाठी ७ सदस्य आणि जनतेतुन थेट सरपंच निवडून देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक जनविकास तर भाजप समर्थक परिवर्तन विकास पॅनलमध्ये थेट लढत आहे. भाजप समर्थक पॅनलला धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील शिनगारे हे लिढ करीत आहेत. या पॅनलकडून रविराज माने हा युवक सरपंचपदाचा उमेदवार आहे.
तर राष्ट्रवादी समर्थक जनविकास पॅनलतर्फे सरपंचपदासाठी सुशिलाबाई शिनगारे यांनी दावेदारी केली. वार्ड क्रमांक एकमध्ये महिला ओबीसी प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे. यात जनविकास पॅनलकडून सासू उषाबाई लिंबा अंकुशे तर सून अर्चंना गोविंद अंकुशे यांच्यात थेट लढत होत आहे. सासू- सून एकाच घरात राहतात. मात्र, दोघींमधून विजयी कोण होणार याचीच चर्चा तालुक्यात रंगली आहे.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत माजी सभापती सुनील शिनगारे यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या निवडणूकीत भाजपच्या पॅनलला १३ पैकी ५ तर राष्ट्रवादीच्या पॅनलला ८ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे ग्रामपंचायच्या निवडणूकीतही कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सोसायटीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीत कस लागणार
आरणवाडी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत भाजपकडून सभापतीच्या नेतृत्वातील पॅनलला पराभव स्विकारावा लागला होता. या निवडणूकीत भाजपच्या पॅनल निवडणूक येण्यासाठी वरिष्ठ नेते रमेश आडसकर यांनी प्रयत्न केले. तरीही भाजपला १३ पैकी ५ जागांवरच समाधान मानावे लागले. त्याचवेळी कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसताना भागवत शिनगारे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या पॅनलने ८ जागांवर विजय मिळवला. ग्रामपंचायत निवडणूकीत भागवत शिनगारे यांच्या आई सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात सुनील शिनगारे यांनी २१ वर्षांच्या युवकाला उमेदवारी दिली आहे. आता या निवडणूकीत सुनील शिनगारे यांच्या पॅनलचा विजय होणार की पराभव याची उत्सुकता वाढली आहे.