जावयाकडून भरदिवसा सासूचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:32+5:302021-04-26T04:30:32+5:30
केज (जि. बीड) : ‘मुलीस चांगले सांभाळा’, असे समजावून सांगण्यास आलेल्या सासू व चुलत मेहुण्यावर जावयाने कोयत्याने हल्ला करून ...
केज (जि. बीड) : ‘मुलीस चांगले सांभाळा’, असे समजावून सांगण्यास आलेल्या सासू व चुलत मेहुण्यावर जावयाने कोयत्याने हल्ला करून खून केल्याची घटना २५ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास केज कळंब महामार्गावरील साळेगावजवळ घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मेहुण्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, केज तालुक्यात महिलेच्या खुनाची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील लोचना माणिक धायगुडे (३५) व त्यांचा चुलत पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे रविवारी साळेगाव येथे आपल्या मुलीला चांगले सांभाळा, असे समजावून सांगण्यासाठी जावई अमोल वैजनाथ इंगळे याच्या घरी आले होते. मात्र जावई शेतातील इंगळे वस्तीवर राहत असल्याचे समजल्याने त्यांनी जावयाशी संपर्क साधला. जावयाने त्यांना केज रस्त्यावरील एका चहाच्या हॉटेलजवळ बोलावून घेतले. तेथे सासू, मेहुणा व जावई यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर लोचना धायगुडे व चुलत पुतण्या अंकुश धायगुडे हे दुचाकीवरून अंबाजोगाईकडे निघाले असता अमोल इंगळे याने सोबत आणलेल्या कोयत्याने मेहुणा अंकुशच्या हातावर वार केले. त्यामुळे तो व लोचना धायगुडे हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. तोच अमोलने सासू लोचना धायगुडे यांच्या मानेवर व तोंडावर कोयत्याने पाच ते सहा वार केले. यात लोचना धायगुडे हिचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा पुतण्या अंकुश हा गंभीर जखमी झाला. सासू व मेहुण्यावर हल्ला केल्यानंतर जावई अमोल इंगळे याने अंकुश धायगुडेची दुचाकी घेऊन पोबारा केला. माहिती मिळताच केज पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी अंकुश यास केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे करत आहेत.
गतवर्षीच झाला होता विवाह
अमोल इंगळे याचा मागील वर्षी लॉकडाऊनमध्येच लोचना धायगुडे यांच्या मुलीशी विवाह झाला होता, तर त्याची पत्नी ही बाळंतपणासाठी माहेरी गेली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.