सासूची आत्महत्या; जावई डॉक्टरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:35+5:302021-05-17T04:32:35+5:30
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील विद्यानगर भागातील सुशीला विश्वनाथ आप्पा बेंबळगे (६०) या महिलेने २० एप्रिल ...
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील विद्यानगर भागातील सुशीला विश्वनाथ आप्पा बेंबळगे (६०) या महिलेने २० एप्रिल रोजी येथील राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांची मुलगी नमिती अमोल रकटे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सुशीला यांच्या नमिती या मुलीचा विवाह डॉ. अमोल शरणाप्पा रकटे यांच्या सोबत काही महिन्यापूर्वीच झाला होता. काही दिवसांतच मुलीच्या सासरकडील मंडळींनी संगनमत करून सुशीला बेंबळगे व घरातील इतरांना जावयाच्या पाया पडायला लावले व लग्नात दिलेले स्त्रीधन तळतळाट करून दिल्याने आमच्या घरास कोप लागल्याचे सांगून दोन लाख रुपये व अंगठीची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यातूनच सुशीला बेंबळगे यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार मुलगी नमिता अमोल रकटे हिने पोलिसांत दिली. त्यावरून सासरकडील जयश्री शरणाप्पा रकटे, शरणाप्पा रकटे, डॉ. अमोल शरणाप्पा रकटे, श्रुती रकटे (सर्व, रा. पिंपळे सौदागर, पुणे) या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस आधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक जी. बी. पालवे हे करीत आहेत.