आई ड्युटीवर, अकरा महिन्यांची लेक कडेवर; निवडणूक विभागाने ड्युटी केली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 07:54 AM2024-05-13T07:54:34+5:302024-05-13T07:59:17+5:30
उन्हाचा त्रास आणि बाळाला सांभाळण्याची अडचण लक्षात घेत निवडणूक विभागाने आईची ड्यूटी रद्द केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : लोकसभा निवडणुकीसाठी बीड मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी रविवारी महिला कर्मचारी आपल्या अकरा महिन्याच्या लेकीला सोबत घेऊन कर्तव्यावर हजर झाली. तिच्या पतीराजांनाही ड्यूटी आल्याने तेही हजर झाले. उन्हाचा त्रास आणि बाळाला सांभाळण्याची अडचण लक्षात घेत निवडणूक विभागाने आईची ड्यूटी रद्द केली.
‘मदर्स डे’च्या दिवशी चिमुकलीच्या आईला हे गिफ्ट मिळाले. सीमा आढाव असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या तिप्पटवाडी सज्जाच्या ग्रामसेविका आहेत.
चिमुकलीला उन्हाचा त्रास झाला अन्...
सीमा यांचे पती दत्ता बनकर हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दोघांना वेगळ्या मतदान केंद्रावर ड्यूटी देण्यात आली. त्यांची मुलगी अधिरा केवळ अकरा महिन्यांची आहे. निवडणूक ड्यूटी आल्यानंतर संबंधित वरिष्ठांकडे विनंती करण्यात आली होती. परंतु, काहीच कार्यवाही न झाल्याने राष्ट्रीय उपक्रमात कर्तव्य म्हणून सीमा आपल्या चिमुकलीला घेऊन रविवारी हजर झाल्या. उन्हाचा त्रास होत असल्याने चिमुकली रडत होती. अखेर ही बाब लक्षात आल्यानंतर आई सीमा यांची ड्यूटी रद्द करण्यात आली.