पोटच्या मुलीला स्वीकारण्यास आईचा नकार; एकाच दिवसात 'ती' झाली नकोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 07:30 PM2018-03-30T19:30:36+5:302018-03-30T19:30:36+5:30
पतीसोबत वाद झाल्यानंतर सहा वर्षांपासून माहेरी राहणारी ‘ती’ महिला गर्भवती राहिली. नऊ महिने पोटात गर्भ वाढविल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु तिला स्वीकारण्यास मातेनेच नकार दिला.
- सोमनाथ खताळ
बीड : पतीसोबत वाद झाल्यानंतर सहा वर्षांपासून माहेरी राहणारी ‘ती’ महिला गर्भवती राहिली. नऊ महिने पोटात गर्भ वाढविल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु तिला स्वीकारण्यास मातेनेच नकार दिला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून त्या ‘नकोशी’ला लातूरच्या शिशूगृहात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गुरुवारी रात्री पाठविण्यात आले. बीडमधील ही घटना आहे.
अनुराधा (नाव बदलेले आहे) ही ४० वर्षीय विवाहिता बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. परिस्थिती हलाखीची आहे. आई-वडील मजुरी करुन पोट भरतात, तर भाऊ ऊसतोड कामगार आहे. अशा परिस्थितीत अनुराधाचे थाटामाटात लग्न लावून दिले. गेवराई तालुक्यात तिला देण्यात आले. काही दिवस सुखाने संसार केला. घरात पाळणाही हलला. घरात महालक्ष्मीच्या रुपाने मुलगी जन्माला आली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच दोघांमध्ये वाद सुरु झाले. वादाचे रुपांतर टोकाला गेले. अनुराधा पतीच्या त्रासाला वैतागून बीड तालुक्यातीलच माहेरी निघून आली. ६ वर्षे माहेरी राहिली.
अशातच ती गर्भवती राहिली. गावात वाच्यता होऊ नये म्हणून २७ मार्च रोजी सकाळी ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. अवघ्या काही तासातच अनुराधाने आणखी एका चिमुकलीला जन्म दिला. दोन दिवस उलटूनही अनुराधाकडे कोणीच नातेवाईक न आल्याने येथील परिचारिकांना तिच्याबद्दल संशय आला. त्यांनी तिची विचारपूस केली असता, तिने सत्य परिस्थिती त्यांना सांगितली. परिचारिकांनी ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना दिली. त्यांनी हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे, अशोक तांगडे, अंकुर तांगडे यांना सांगितला. त्यांनी सदरील महिलेची भेट घेतली. तिला मानसिक आधार दिला. विश्वासात घेऊन तिच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली. अनुराधाने मुलगी सांभाळण्यास स्पष्ट नकार दिला. सामाजिक कार्यकर्त्यांनी समजूत काढली मात्र फायदा झाला नाही. अनुराधा निर्णयावर ठाम होती. कांबळे, तांगडे यांनी महिला व बाल कल्याण मंडळाशी संपर्क केला. अनुराधाला त्यांच्यासमोर हजर केले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुराधाच्या परवानगीने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्या चिमुकलीला लातूर येथील शिशूगृहात पाठविण्यात आले. सध्या अनुराधा माहेरी असल्याचे सांगण्यात आले.
अनुराधाचे मनोबल खचले
पतीपासून दुरावल्यानंतरही अनुराधा अपघाताने गर्भवती राहिली. गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती व ज्ञान नसल्याने ती रुग्णालयापर्यंत जाऊ शकली नाही. तिला कोणी मार्गदर्शनही केले नाही. अशातूनच तिचा गर्भ वाढला आणि गोंडस चिमुकलीला जन्म दिला. यामुळे तिचे मनोबल खचले होते. बदनामी होऊ नये यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.