आई! सांग ना माझी काय चूक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:20 AM2019-04-28T00:20:21+5:302019-04-28T00:21:00+5:30
अनैतिक संबंधातून जन्मलेले तसेच मुलगी, नको, अशा मनस्थितीत असलेल्यांकडून ९ महिने पोटात वाढविलेल्या मुलाला जन्मानंतर रस्त्यावर फेकून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अनैतिक संबंधातून जन्मलेले तसेच मुलगी, नको, अशा मनस्थितीत असलेल्यांकडून ९ महिने पोटात वाढविलेल्या मुलाला जन्मानंतर रस्त्यावर फेकून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील दोन वर्षात तब्बल १२ अर्भक जन्मानंतर कचऱ्याप्रमाणे निर्जनस्थळी फेकुन दिले आहेत. मातृत्वाचे ओझे झाल्यानेच माणूसकी हरवलेले लोक असे क्रुर कृत्य करीत आहेत. असे असले तरी अवघ्या काही क्षणात आईची कुस सोडलेले हे चिमुकले ‘आई! सांगना गं, माझी काय चुक आहे...’ असा प्रश्न जन्मदातीला विचारत आहेत.
कपडे, गाडी, बंगला, पैशांचे आकर्षण पाहून मुले-मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात. सोबत राहून एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची वचन देतात. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचाही समावेश असतो. प्रेमाच्या नावाखाली ते एकमेकांत एवढे गुंततात की, शारिरीक संबंध कधी आले, हे सुद्धा त्यांना समजत नाही. त्यानंतर मुलगी गर्भवती राहते. गर्भपात करण्यास गेल्यावर सर्वांना माहिती होईल, या भितीने ९ महिने पोटात गर्भ वाढविते. मुलगा किंवा मुलीला जन्म देते. त्यानंतर काही तासांतच त्याला कापडात गुंडाळून रस्त्यावर, कचरा कुंडी, खड्डा, वळण आदी ठिकाणी फेकून दिले जाते. काही वेळाने त्याच्या रडण्याचा आवाज किंवा मयत असेल तर पक्षी, कुत्र्यांची गर्दी पाहून कोणाला तरी संशय येतो. त्यानंतर त्याला उचलून पोलिसांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले जाते. मयताचे शवविच्छेदन तर जिवंत अर्भकावर उपचार करून प्रकृती ठणठणीत होताच शिशुगृहात पाठविले जाते. अंगावर काटा आणणारा हा घटनाक्रम अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांबाबत घडतो, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात सापडलेल्या गुन्ह्यांचा प्रकार असाच काहीसा असू शकतो, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासानंतरच खरे सत्य बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले.
गुन्हा क्रमांक १
बीड शहर पोलीस ठाणे - तपास पोउपनि मनीषा जोगदंड
गेवराई तालुक्यातील एका महिलेने जिल्हा रूग्णालयात मुलीला जन्म दिला. दुर्दैवाने ती जन्मत:च मयत निघाली. डॉक्टरांनी तिची घरी नेऊन अंत्यविधी करण्यास सांगितले. मात्र सदरील महिलेच्या सोबत असलेल्या एका वृद्धेने हे अर्भक पिशवीत घालून पोलीस कॉलनीच्या बाजुच्या नालीत टाकले. सकाळी ते उघडकीस आल्यावर पोउपनि मनीषा जोगदंड यांनी याचा तपास केला. अवघ्या दोन दिवसात याचा तपास करून या वृद्ध महिलेला ताब्यात घेत गुन्हा उघड केला होता.
गुन्हा क्रमांक २
पिंपळनेर पोलीस ठाणे -
तपास पोउपनि एस.एम.काळे
बीड तालुक्यातीलच एका गावात रस्त्याच्या कडेला जिवंत अर्भक सापडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत जिल्हा रूग्णालयात उपचार केले. डीएनए चाचणी केली. यामध्ये एका महिलेसोबत हे डीएनए जुळले. सदरील महिला पतीपासून वेगळी राहत होती. माहेरी असतानाच तिचे गावातील एका पुरूषासोबत सुत जुळले. यातून ती गर्भवती राहिली होती. विशेष म्हणजे हा प्रकार कुटूंबियांना माहिती होता. हे तपासातून पुढे आले होते. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत तिच्यावर गुन्हाही दाखल केला होता. न्यायालयात हजर केल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी मिळाली. पोलीस कोठडी न मिळाल्याने अर्भकाचा पिता कोण? याचा शोध पोलिसांना घेता आला नाही. हा तपासही पिंपळनेरचे पोउपनि एस.एम.काळे यांनी केला होता.