धक्कादायक! वंशाला हवाय दिवा, 'मुलाचा हट्ट माय-लेकराच्या जीवावर बेतला'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:52 AM2018-12-30T00:52:56+5:302018-12-30T11:18:20+5:30
येथील रहिवासी असलेल्या मीरा रामेश्वर एखंडे (वय ३८) या महिलेला आठव्यांदा प्रसुतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
माजलगाव : येथील रहिवासी असलेल्या मीरा रामेश्वर एखंडे (वय ३८) या महिलेला आठव्यांदा प्रसुतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, ऐनवेळी परिस्थिती गंभीर बनल्याने सात मुलींच्या पाठीवर जन्मलेल्या मुलाचा व महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली.
मीरा एखंडे यांना अगोदर सात मुली आहेत. त्या पुन्हा आठव्यांदा गर्भवती राहिल्या. शुक्रवारी त्यांना त्रास होऊ लागल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. रात्री सात वाजण्याच्या दरम्यान त्यांना प्रसुतीसाठी घेण्यात आले. प्रसुतीदरम्यान मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. ही बाब डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ रक्त उपलब्ध केले. रक्त चढविण्यास सुरूवातही झाली. मात्र, रक्तस्त्राव काही केल्या थांबत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ शहरातील इतर स्त्रीरोग तज्ज्ञांना पाचारण केले. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी अनिल परदेशी, डॉ. गजानन रूद्रवार व डॉ. राजेश रूद्रवार तसेच येथे असलेल्या परिचरिकांनी तब्बल तीन तास तिच्यावर उपचार केले. मात्र, सात मुलींच्या पाठीवर जन्माला येणाºया मुलगा अािण त्याच्या आईला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. ही घटना नातेवाईकांना समजताच त्यांनी रूग्णालयातच आक्रोश केला. यामुळे परिसर सुन्न झाला होता.