पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार पाच हजार रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:27+5:302021-09-03T04:35:27+5:30
बीड : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत ‘मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. सर्व स्तरातील मातांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यांत ...
बीड : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत ‘मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. सर्व स्तरातील मातांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जात आहेत. आरोग्य विभागाची ही योजना असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरोदर मातांची शासकीय आरोग्य संस्थेत आल्यावर तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना पहिल्या टप्प्यात हजार रुपये, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी दोन हजार असे तीन टप्प्यात पाच हजार रुपये दिले जात आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती व संपर्क साधण्याचे ठिकाण प्रत्येक आरोग्य संस्थेत दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत. तसेच आशाताई, अंगणवाडी सेविकांकडेही याची माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक मातांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
लाभासाठी या अटी
लाभार्थीने गरोदरपणाची नोंद आर.सी.एच. पोर्टलमध्ये ए.एन.एम. यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर १०० दिवसांच्या आत करावी. गरोदरपणाच्या सहा महिन्यांत (१८० दिवस) किमान १ प्रसूतीपूर्व तपासणी होणे आवश्यक आहे. प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नाेंद, बीसीजी, ओपीव्ही याची एक मात्र पेंटाव्हॅलेट ओपीव्ही लसीच्या तीन मात्रा देणे आवश्यक आहेत.
या कागदपत्रांची आवश्यकता
पहिला, दुसरा व तिसरा लाभ मिळण्याकरिता आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पतीचे आधार कार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, माता व बाल संरक्षण कार्डची प्रत द्यावी. या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेंतर्गत त्या योजनेच्या निकषानुसार अतिरिक्त लाभ मिळेल.
--
पहिला हप्ता १०००
दुसरा हप्ता २०००
तिसरा हप्ता ३०००
--
आतापर्यंत नोंदणी - ६८६८९
निधी वाटप - २९ कोटी ९ लाख
--
प्रधानमंत्री मातृ वंदना ही योजना मातांसाठी खरोखरच लाभदायक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २९ कोटी रुपयांचा निधी वाटप झाला आहे. यापुढेही मातांना जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेला जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सूचना करण्यात येतील.
रवींद्र पवळ, जिल्हा समन्वयक बीड